![]()
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिला कारागृहात ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जात असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाने केला आहे. या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपीला कारागृहात विशेष वागणूक मिळत असल्याचा संशय निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. प्रभावशाली व्यक्ती किंवा आर्थिक ताकदीच्या आधारे कारागृहात नियमबाह्य सुविधा पुरवल्या जात असतील, तर त्यामुळे न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कमी होऊ शकतो. या प्रकरणी आरोपीला नेमक्या कोणत्या सुविधा दिल्या जात आहेत, त्यात कोणत्या कारागृह अधिकाऱ्यांची भूमिका आहे आणि नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. कारागृहातील प्रवेश नोंदी, भेटींची नोंद, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीला मिळालेल्या सुविधांची तपासणी करावी, असेही पक्षाने म्हटले आहे. आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक आहे. जर हे आरोप खरे ठरले, तर संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाने केली आहे. याचबरोबर, केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय वेळेत पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करावे आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, सिया गोयलला कारागृहात ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जात असल्याच्या आरोपांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या आरोपांच्या चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
Source link
सिया गोयलला कारागृहात VIP ट्रीटमेंट?:रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी