Headlines

देवगाव रंगारीतून परदेशात होणार भेंडीची निर्यात:घटस्थापनेच्या मुहूर्तावर लागवडीला प्रारंभ, जानेवारी 2027 मध्ये काढणी‎




शेतकऱ्यांच्या शेतीमालाला केवळ स्थानिक किंवा देशांतर्गत बाजारपेठेपुरते मर्यादित न ठेवता, थेट परदेशातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याच्या ध्येयाने देवगाव रंगारी येथे एका नियोजनबद्ध निर्यातक्षम भेंडी उत्पादन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे यंदाचे सीमोल्लंघन परदेशात ही संकल्पना प्रत्यक्ष साकारत मराठवाड्याच्या मध्यवर्ती भागातून जर्मनी, युरोप आणि लंडनच्या नामांकित बाजारपेठांपर्यंत उच्च दर्जाच्या भेंडीची निर्यात करण्याची एक नवी व समृद्ध दिशा या उपक्रमातून निर्माण केली जात आहे. या नाविन्यपूर्ण व महत्त्वाकांक्षी उपक्रमात शासकीय सेवेतून निवृत्त झालेले उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण यांचा पुढाकार मार्गदर्शक ठरला आहे. हा उपक्रम एसआरसी फार्मर व थ्री सर्कल ॲग्रो यांच्या संयुक्त सहयोगातून राबविण्यात येत आहे. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर देवगाव रंगारी परिसरात भेंडी लागवडीला प्रत्यक्ष प्रारंभ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई येथील निर्यातदार संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या भेंडी बियाण्याचा पुरवठा, पिकासाठी आवश्यक औषध फवारणीचे तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष शेतातून उत्पादित मालाच्या वाहतुकीचे संपूर्ण नियोजन केले जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी भेंडीचा खरेदी दर प्रति किलो ३० रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतीमालाचे पैसे दर दहा दिवसांनी थेट त्यांच्या बँक खात्यात विनाविलंब जमा करण्याचे पारदर्शक नियोजनही करण्यात आले आहे. भेंडी लागवडीचा कालावधी १० ऑक्टोबरपर्यंत निश्चित असून, जानेवारी २०२७ च्या अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने काढणीचा हंगाम पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. यासंदर्भात फलटण येथील चंद्रकांत शेंडे यांनी ६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार उच्च प्रतीचे बियाणे आधीच प्राप्त झाले आहे. ५० शेतकरी, २५ एकर क्षेत्र; निर्यातक्षम उत्पादन या कार्यक्रमांतर्गत परिसरातील ५० कौशल्याभिमुख व प्रगतिशील शेतकऱ्यांचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे. योजनेनुसार प्रत्येक सहभागी शेतकरी आपल्या २० गुंठे क्षेत्रावर निर्यातक्षम भेंडीची लागवड करणार असून, संपूर्ण उपक्रमातून एकूण २५ एकर क्षेत्रावर भेंडीचे विक्रमी व दर्जेदार उत्पादन घेण्याचे स्पष्ट उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार योग्य दर्जाचा, रसायनमुक्त व आकर्षक भेंडीमाल उत्पादित करून त्याला थेट युरोपियन देशांची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर या मोहिमेत मुख्य भर दिला जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *