![]()
नात्यातील एका तरुणीशी बोलत असल्याच्या रागातून एका 19 वर्षांच्या तरुणावर एकाने चाकूचे 3 वार करून त्याची हत्या केली. गारखेड्यातील साईनगर भागात बुधवारी ( 14 ऑक्टोबर) रात्री 11 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. तौसिफ शमीम शेख (19, रा. साईनगर, गल्ली क्र. 3) असे मृताचे नाव आहे. खून केल्यानंतर खासगी बसने थेट बीडला पळून गेलेल्या आदित्य अशोक शेळके (19) या आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ आणि आदित्य हे एकाच परिसरात राहणारे आहेत. बुधवारी रात्री गारखेडा भागात आदित्यच्या नात्यातील तरुणीशी तौसिफ बोलत होता. हे पाहताच आदित्यने तौसिफला हटकले. ‘तू माझ्या नात्यातील मुलीशी का बोलतोस?’ यावरून दोघांमध्ये झटापट झाली. यानंतर रात्री 10.30 ला तौसिफ आणि त्याचा चुलत भाऊ मुजम्मीर शेख हे नूर मशिदीच्या पाठीमागे बसले असताना आदित्य चाकू घेऊन तेथे आला. काही समजण्याच्या आतच त्याने तौसिफच्या छातीत, नाकावर आणि डोक्यावर चाकूने तीन वार केले. जखमी तौसिफला आधी एमजीएममध्ये तर नंतर घाटीत दाखल केले. मिस्त्रीकाम करत होता तौसिफ तौसिफ हा सेंट्रिंग आणि मिस्त्रीकाम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे करत आहेत. चौकशीनंतर बीड कनेक्शन खुनानंतर आदित्यने खासगी बसने बीडला पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी धाव घेतली. रात्रीच आरोपीच्या घरी जाऊन नातेवाइकांची चौकशी केली असता, तो बीडच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी बीड गाठून आरोपीला अटक केली. आदित्यला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे. दुचाकीवरून तौसिफला नेले रुग्णालयात जखमी झालेला तौसिफ काही प्रतिसाद देत नव्हता. त्यावेळी तेथे गल्लीतील नागरिकही जमले होते. जखमी तौसिफला त्याचा चुलत भाऊ मुस्तकीम आणि एका मित्राने दुचाकीवर उचलून बसवले. व त्याला आधी एमजीएम रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तौसिफचा मृत्यू झाल्याचे सांगितले, अशी माहिती नोंद एफआयआरमध्ये आहे. घटनेनंतर साईनगर भागात रात्री उशिरा परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या शहरात उत्सवाचे वातावरण आहे. रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. अशा काळात रस्त्यावर चाकूहल्ल्याचा प्रकार गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये रात्री उशिरापर्यंत पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज आहे. एखादी घटना घडल्यानंतर काही कारवाई करण्याऐवजी आधीच खबरदारी घेतल्यास अशा घटना टाळल्या जातील.
Source link
नात्यातील तरुणीशी का बोलतो म्हणत छातीमध्ये चाकू भोसकून तरुणाचा खून:संभाजीनगरच्या गारखेड्यातील साईनगर भागातील घटना, बीडला पळालेल्या आरोपीस अटक