Headlines

स्वतः "डिजिटल अरेस्ट’मधून वाचला, नंतर बोगस ॲप्स बनवत 150कोटींचा गंडा:बिहार-झारखंडच्या टोळ्यांसाठी तयार केले 2,805 बनावट ॲप्स




पाच वर्षांपूर्वी स्वतः ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यातून थोडक्यात वाचलेल्या पंकज गुप्ता (३६) या इंदूरच्या ग्राफिक डिझायनरला मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने इंदूर येथून अटक केली आहे. फसवणुकीच्या या जुन्या अनुभवातून त्याने सायबर गुन्हेगारीचा मार्ग निवडला. कोडिंगचे ज्ञान असल्याने त्याने बिहार व झारखंडमधील कुख्यात सायबर टोळ्यांशी थेट हातमिळवणी केली. ज्येष्ठ नागरिक कार्ड, ई-चलान, पेन्शन, क्रेडिट कार्ड आणि ‘पीएम किसान योजना’ अशा शासकीय नावांचा गैरवापर करून त्याने २,८०५ बनावट मालवेअर (APK फाइल्स) ॲप्स तयार केले. डेटा साठवण्यासाठी विविध कंपन्यांचे सर्व्हर भाड्याने घेऊन तो प्रत्येक फाइल टोळ्यांना २० ते २५ हजार रुपयांना विकायचा. त्याच्या या धोकादायक ॲप्सद्वारे भामट्यांनी देशभरातील तब्बल ९,६७३ निष्पाप नागरिकांची १५० कोटी रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ५.६२ लाखांच्या फसवणुकीनंतर रॅकेट आले उघडकीस मुंबईतील भायखळा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला १३ ऑगस्ट रोजी फोन आला. समोरील व्यक्तीने बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून ‘ज्येष्ठ नागरिक कार्ड योजने’चे आमिष दाखवले. मेसेजद्वारे पाठवलेल्या लिंकवरून एपीके फाइल डाउनलोड करताच, ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून ५.६२ लाख रुपये परस्पर लंपास झाले. या तक्रारीनंतर मुंबई गुन्हे शाखेने तांत्रिक धागेदोरे शोधून थेट इंदूरमध्ये छापा टाकत गुप्ताला अटक केली. बनावट एपीके फाइल म्हणजे काय? मोबाइल कसा हॅक होतो?
प्रश्न १: एपीके फाइल नेमकी काय असते?
उत्तर: एपीके किट हा अँड्रॉइड फोनवर ॲप्स इन्स्टॉल करण्याचा फॉरमॅट आहे. अधिकृत गुगल प्ले स्टोअरच्या बाहेरून व्हॉट्सॲप किंवा लिंकद्वारे डाऊनलोड केली जाणारी फाइल म्हणजे बनावट एपीके असू शकते.
प्रश्न २: डाऊनलोड केल्यास फोनमध्ये काय?
उत्तर: ही बनावट फाइल डाऊनलोड होताच मोबाइलमध्ये छुपा मालवेअर सक्रिय होतो. हा मालवेअर युजरच्या नकळत फोनमधील बँक मेसेज, फोन कॉल्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे “ओटीपी’ थेट सायबर चोरांच्या सर्व्हरवर पाठवतो. त्यामुळे बँकेतून पैसे काढताना नागरिकांना कोणताही अलर्ट दिसत नाही. वित्तीय डेटा लीक आणि संघटित सायबर सिंडिकेट वित्तीय संस्था आणि बँकांमधून लीक झालेला ग्राहकांचा संवेदनशील डेटा भामट्यांच्या हाती लागतो. या डेटामधून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना विशेष लक्ष्य केले गेले. गुप्ताने तयार केलेल्या या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून राष्ट्रीय सायबर पोर्टलवर देशभरातून १,०७४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात महाराष्ट्रातील १४२ आणि मुंबईतील ३६ तक्रारींचा समावेश आहे. केवळ एका कोडरने संपूर्ण देशात १५० कोटींचे जाळे विणल्याने आता देशातील सायबर गुन्हे केवळ फोन कॉल्सपुरते मर्यादित न राहता अत्याधुनिक सॉफ्टवेअर सिंडिकेट बनल्याचे सिद्ध झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *