Headlines

Navnath Ban Slams Sanjay Raut Over Election Results


“देशात विरोधक जिथे जिंकतात, तिथे निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम आणि न्यायालय सर्व काही योग्य असते; मात्र महाराष्ट्र, बिहार किंवा छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय झाला की यांना लगेच संविधानाची आठवण होते आणि ‘रेझिम चेंज’ची (सत्तांतराची) स्वप्ने पडू लागतात. जर भाज

.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला. आंदोलक अभिजीत दीपके यांची तुलना हुतात्मा भगतसिंग व राजगुरू यांच्याशी करणे, आंदोलनांच्या नावाखाली बांगलादेश व श्रीलंकेसारखी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न आणि तिरंग्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चालवलेल्या राजकारणाची त्यांनी कडक शब्दांत पोलखोल केली.

जिंकले की लोकशाही, हरले की ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर खापर!

संजय राऊत यांच्या ‘रेझिम चेंज’च्या दाव्यावर बोलताना नवनाथ बन म्हणाले, “केरळ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये जेव्हा काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार आले, तेव्हा याच निवडणूक आयोगाने आणि याच यंत्रणेने निवडणुका घेतल्या होत्या. मग तिथे हे कधी सत्तांतराचे स्वप्न का पाहत नाहीत? झारखंडमध्ये जेव्हा एमपीएससी/स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीविरोधात लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, तेव्हा राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या तोंडात नेमका कोणी बोळा कोंबला होता?”

भाजप जिंकले की पोटदुखी!

“कर्नाटकात सत्ता बदलण्यासाठी किंवा काँग्रेस सरकार उलथवून टाकण्यासाठी जर एखादे आंदोलन उभे राहिले, तर संजय राऊत त्याचे स्वागत करतील का? ठरावीक राज्यांमध्येच जाणीवपूर्वक भाजपला टार्गेट करून वातावरण बिघडवण्याचे राऊतांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत.”

कसाबही बोटीवर तिरंगा लावूनच आला होता!; क्रांतिकारकांशी तुलना करून हुतात्म्यांचा अवमान करू नका

अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाची हुतात्मा भगतसिंग यांच्याशी तुलना केल्याच्या राऊतांच्या विधानावर बन यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “ज्यांचे मालक काही दिवसांपूर्वी अभिजीत दीपकेची तुलना थेट विष्णूच्या अवताराशी करत होते, तेच आता त्याची तुलना देशासाठी फासावर गेलेल्या भगतसिंग आणि राजगुरू यांच्याशी करत आहेत. भगतसिंग आणि राजगुरू देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करत होते; देशात बांगलादेश आणि नेपाळसारखी जाळपोळ व अराजकता पसरवण्यासाठी त्यांनी बलिदान दिले नव्हते.”

तिरंग्याचा गैरवापर खपवून घेणार नाही

“आम्हाला तिरंग्याचा सर्वोच्च अभिमान आहे आणि भाजप तिरंग्याचा स्वाभिमान जपते. पण २६/११ चा हल्ला करण्यासाठी अजमल कसाब मुंबईत आला होता, तेव्हा त्यानेही ज्या बोटीवर प्रवेश केला त्यावर तिरंगाच फडकत होता. मग कसाबने तिरंगा लावला म्हणून त्याने मुंबईकरांवर केलेल्या हल्ल्याचे आणि घेतलेल्या निष्पाप जीवांचे समर्थन करायचे का? तिरंग्याचा आडोसा घेऊन जर कोणी देशाला वेठीस धरत असेल, तर त्याचे समर्थन होऊ शकत नाही.”

घरोघरी तिरंगा भाजपने पोहोचवला

“काँग्रेसच्या काळात सर्वसामान्यांना घरावर तिरंगा लावण्याची परवानगी नव्हती; तसे केल्यास गुन्हे दाखल व्हायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवून हा राष्ट्रध्वज प्रत्येक सामान्याच्या हातामध्ये आणि घरावर अभिमानाने फडकवण्याचे काम भाजपने केले.”

दिपकेने कोर्टात माफीनामा दिला, बॉण्ड लिहिला अन् विश्वासघात केला

आंदोलनातील अटकेवर आणि भाजपच्या कथित दबावावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “अभिजीत दीपकेला कोणत्याही भाजप कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलेले नाही, तर कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी रीतसर अटक केली आहे. यापूर्वी विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी दीपकेने स्वतः न्यायालयात लेखी माफीनामा सादर केला होता, हमीपत्र (बॉण्ड) आणि शपथपत्र लिहून दिले होते की, पुढील एक वर्ष या परिसरात आंदोलन करणार नाही. मात्र, न्यायालयाला दिलेल्या शब्दाचा विश्वासघात करून पुन्हा दिल्लीत बेकायदेशीर आंदोलन छेडल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली.”

आंदोलनाला विरोध नाही, अराजकतेला विरोध

“लोकशाहीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. दिल्लीत रामलीला मैदानावर हवं तर महिनाभर किंवा वर्षभर आंदोलन करा, कोणी अडवले? यापूर्वी शाहीन बागचे आंदोलन सहा महिने चालले, शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर चालले; सरकारने लोकशाही अधिकारांचा आदर केला. मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन झाले, तेव्हाही विरोध केला नाही. परंतु आंदोलनाच्या आडून श्रीलंकेसारखा आगडोंब, नेपाळसारखा हिंसाचार आणि परकीय शक्तींच्या जोरावर देश अस्थिर करण्याचा प्रयत्न झाल्यास देशातील १४० कोटी जनता त्याचे चोख उत्तर देईल.”

मातोश्रीवर जाऊन विचारा कुणाचे अवयव लुळे-पांगळे झाले!

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या व्यक्तिगत टीकेला नवनाथ बन यांनी सडेतोड उत्तर दिले. “संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्र्यांना राजकीय ज्ञानाचा दुष्काळ आहे आणि त्यांचे अवयव जागेवर आहेत का? राऊतांनी आधी स्वतःचे आणि स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व तपासावे. ‘एक तर तू राहशील किंवा मी राहील’ अशी भाषा वापरणाऱ्या उद्धव ठाकरेंचे आणि तुमच्या पक्षाचे जनतेने निवडणुकीत काय हाल केले, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. कोणाचे अवयव लुळे-पांगळे झाले, हे एकदा मातोश्रीवर जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे,” असा टोला नवनाथ बन यांनी लगावला.

——————————————————–

हेही वाचा…

न्यायासाठी पुन्हा तुरुंगात जायलाही तयार!:संजय राऊतांचा हल्लाबोल, बांगलादेश-श्रीलंकेचे दाखले देत ‘रेझिम चेंज’च्या आंदोलनाचे जोरदार समर्थन

“देशाचे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्चच आहे आणि संविधानावर आमची गाढ श्रद्धा आहे. ज्येष्ठ वकिलांच्या सल्ल्यानुसार न्यायालयाचा अवमान झाला अशी भावना असेल तर मी दिलगिरी व्यक्त करून माफीही मागितली आहे. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय द्यावा. साडेचार वर्षांपासून शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह घटनाबाह्य पद्धतीने तिसऱ्याच पक्षाला बहाल करून आम्हाला मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले गेले आहे. चाळीस आमदारांच्या अपात्रतेचा फैसला अद्याप प्रलंबित आहे. मतदारयादीतून कोट्यवधी मतदारांची नावे वगळून लोकशाहीची उघड हत्या केली जात आहे. या अन्यायाविरोधात लढताना मला जर पुन्हा तुरुंगात जावे लागले, तरी माझी कोणतीही तक्रार नाही; मी तुरुंगात जाण्यास तयार आहे,” असा आक्रमक पवित्रा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेतला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.