Headlines

मोहन भागवतांचे अमेरिकेत पारंपरिक स्वागत:'युनिव्हर्सल वननेस' कार्यक्रमावरून न्यूयॉर्कमध्ये विरोधकांचे निदर्शने




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत १५ दिवसांच्या परदेश दौऱ्यावर अमेरिकेत दाखल झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्यांचे भारतीय वंशाच्या नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जागतिक संपर्क अभियानाचा हा भाग असून, ते अमेरिकेनंतर कॅनडा आणि ब्रिटनलाही भेट देणार आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कमध्ये एका मोठ्या कार्यक्रमावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. डॉ. मोहन भागवत २९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस’ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आयोजकांच्या माहितीनुसार, या भव्य कार्यक्रमाला सुमारे ५ हजार भारतीय वंशाचे नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमावरून अमेरिकेत काही संघटनांकडून विरोध आणि निदर्शने सुरू झाली आहेत. न्यूयॉर्कच्या राजकीय वर्तुळातही या दौऱ्यामुळे चर्चा रंगली असून, काहींनी यावर आक्षेप घेतला आहे. शहर प्रशासनाने पत्रकार परिषदेत या रॅलीचे समर्थन करत नसल्याचे स्पष्ट केले, परंतु खासगी कार्यक्रम रद्द करण्याच्या अधिकारांबाबत अनभिज्ञता दर्शवली. ‘हिंदूज फॉर ह्यूमन राइट्स’, ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’ आणि ‘इंटरफेथ सेंटर ऑफ न्यूयॉर्क’ यांसारख्या संघटनांनी न्यूयॉर्क सिटी हॉलच्या बाहेर निदर्शने केली. त्यांनी मॅडिसन स्क्वेअर गार्डन प्रशासनाकडे हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे. या विरोध आणि वादाच्या पार्श्वभूमीवर, कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या ‘अहेड फोरम’ या संस्थेने सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘युनिव्हर्सल वननेस’ कार्यक्रमाचा मुख्य उद्देश संपूर्ण जगाला एकत्र आणणे हा असून, “वसुधैव कुटुंबकम्” (संसार हेच कुटुंब आहे) हा यामागचा मूळ संदेश आहे, असे आयोजकांनी म्हटले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून परस्पर सन्मान, सौहार्द आणि एकतेची भावना रुजवण्याचे आवाहन केले जाणार आहे. अमेरिकेतील या कार्यक्रमानंतर डॉ. मोहन भागवत कॅनडातील टोरंटो आणि ब्रिटनमधील लंडन येथे भेट देणार आहेत. तेथे ते सामुदायिक नेतृत्वाशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये संवाद साधतील. संघ शताब्दीच्या निमित्ताने जागतिक स्तरावर संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *