Headlines

112 वा जन्मोत्सव उत्साहात:ललिता पंचमीनिमित्ताने बोरदहेगाव येथे जनार्दन स्वामींच्या पालखीची मिरवणूक




वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव येथे निष्काम कर्मयोगी जगद्गुरू राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचा ११२ वा जन्मोत्सव ललिता पंचमीच्या शुभ मुहूर्तावर गुरुवारी उत्साहात, भक्तिमय वातावरणात पार पडला. जनार्दन स्वामी महाराज यांच्या या पावन जन्मभूमीत उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली, मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ललिता पंचमी जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनार्दन स्वामी महाराज यांच्या जन्मभूमी मंदिराला नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार, गाभारा तसेच जनार्दन स्वामी महाराज आणि त्यांच्या मातोश्री म्हाळसामाता यांच्या मूर्ती सुगंधी, रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक हारांनी सुशोभित करण्यात आल्या होत्या. ललिता पंचमीनिमित्त पहाटेच्या सुमारास जनार्दन स्वामी महाराजांच्या मूर्तीला पंचामृत व दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर धार्मिक विधी व महाआरती पार पडली. उत्सवानिमित्त संपूर्ण बोरदहेगावमधील महिलांनी प्रत्येक रस्त्यावर आकर्षक सडा-रांगोळी काढली होती. संपूर्ण गावात घरोघरी आनंदाने गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. दुपारी ठीक १२ वाजता जनार्दन स्वामी महाराज यांच्या पालखीची संपूर्ण गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर दुपारी २ वाजता स्वामी शांतीगिरीजी महाराज आणि त्यांच्या शिष्यमंडळींचा भावपूर्ण सत्संग सोहळा पार पडला. या सोहळ्यात स्वामी शांतीगिरीजी महाराज व त्यांचे शिष्य विवेकानंद महाराज यांनी जनार्दन स्वामी महाराजांच्या जीवनचरित्रावर, त्यांच्या शिकवणीवर प्रवचनातून सविस्तर प्रकाश टाकला. तसेच जगद्गुरू स्वामी जनार्दन स्वामी महाराजांच्या दुर्मिळ, संग्रहित निवडक आठवणरूपी प्रवचनांची ध्वनिफीत उपस्थितांना ऐकवण्यात आली. या सोहळ्यासाठी बाबाजी परिवाराचे महंत विवेकानंद महाराज, १०८ सेवागिरीजी महाराज, महंत महेंद्रगिरी महाराज, महंत कैवल्यानंद महाराज यांच्यासह कृषिभूषण अप्पासाहेब रामकृष्ण पाटील, बाजार समितीचे सभापती कल्याण दांगोडे, सुभाष तांबे, पंचायत समिती सभापती वंदना बाळू शिंदे, पंचायत समिती सदस्य राहुल शेळके आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्यात ३७ वे पुण्यस्मरण या सोहळ्यात स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी जाहीर केले की, यंदा बाबाजींचे ३७ वे पुण्यस्मरण सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त १४ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे. याप्रसंगी सर्व संत-महंतांच्या हस्ते पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या पत्रिकेचे औपचारिक अनावरण करण्यात आले. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा जन्मोत्सव आणि ललिता पंचमी उत्सव कार्यक्रम जन्मभूमी बोरदहेगाव येथेच होतील, अशी घोषणा स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *