Headlines

वैजापूर‎:पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलक चढले टाकीवर; नागमठाण्यात तणाव




गोदावरी नदीवरील वांजरगाव, खानापूर आणि कमलपूर या तीन केटी बंधाऱ्यांत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी नागमठाण येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शुक्रवारी दुसऱ्या दिवशी नाट्यमय वळण मिळाले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त तरुण आंदोलक थेट गावातील उंच पाण्याच्या टाकीवर चढले. तेथून त्यांनी घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, हरिशरण महाराजांनी आंदोलकांना जीव धोक्यात न घालण्याचे आवाहन केल्यानंतर तरुण टाकीवरून खाली उतरले. मात्र, बंधाऱ्यांत पाणी सोडेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. गोदावरीकाठच्या वैजापूर आणि श्रीरामपूर तालुक्यांतील अनेक गावांची शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याची गरज या बंधाऱ्यांवर अवलंबून आहेत. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारपासून नागमठाण येथे आंदोलन सुरू करण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशीही मागणीबाबत ठोस निर्णय न झाल्याने आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. बंधाऱ्यांत तातडीने पाणी सोडावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.दरम्यान, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संदीपानजी महाराज, योगेंद्र गिरीजी महाराज आणि रघुनंदन गिरीजी महाराज यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला. जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे आणि अजय साळुंके यांनीही आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *