Headlines

अन्न, औषध प्रशासनाची कारवाई:नियमांचे उल्लंघन; लासूर स्टेशनमध्ये 15 लाख रुपयांचे सोयाबीन तेल जप्त




ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न सुरक्षा विभागाने शुक्रवारी लासूर स्टेशन येथील मेसर्स पोळ ॲग्रो इंडस्ट्रीज या तेल पुनर्पॅकिंग युनिटवर कारवाई केली. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने १५ लाख २ हजार ५०० रुपये किमतीचा ९ हजार १६५ किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला आहे. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा मानकांचे पालन करण्यात गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित युनिटचा अन्न परवाना तातडीने निलंबित करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लासूर स्टेशन येथील मालमत्ता क्रमांक २४४८ येथे स्थित असलेल्या कारखान्यावर अचानक छापा मारून तपासणी केली. या तपासणीदरम्यान तेथे ‘सोनेरी’ आणि ‘रुपेरी’ या ब्रँड नावाने विक्रीसाठी ठेवलेला रिफाइंड सोयाबीन तेलाचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये ‘सोनेरी’ ब्रँडचे ११ लाख ७७ हजार ६०० रुपये किमतीचे ७ हजार ३६० किलो तेल, तर ‘रुपेरी’ ब्रँडचे ३ लाख २४ हजार ९०० रुपये किमतीचे १ हजार ८०५ किलो तेल असा एकूण ९ हजार १६५ किलो तेलाचा साठा अधिकाऱ्यांनी जागेवरच जप्त केला. कारखान्याच्या तपासणी अहवालानुसार, ८६ पैकी केवळ १९ गुण मिळाले असून अन्न सुरक्षा मानकांचे कसलेही पालन होत नसल्याचे गंभीर निरीक्षण नोंदविण्यात आले. कच्च्या तसेच तयार तेलाच्या प्रयोगशाळा तपासणीच्या नोंदी उपलब्ध नसणे, कारखान्यात पूर्णवेळ तांत्रिक व्यक्तीची नियुक्ती नसणे, जमिनीची फरशी तेलकट व चिकट असणे, मशिनरी आणि भिंतींवर तेलाचे जाड थर साचलेले असणे, तसेच थेट उत्पादन विभागातच अन्नकचरा अस्ताव्यस्त पडून असणे, अशा अनेक गंभीर त्रुटी या कारवाईत उघडकीस आल्या. याशिवाय कारखान्यात योग्य व्हेंटिलेशन व्यवस्था नसणे, भिंतींचे प्लास्टर व रंग उखडलेले असणे आणि कीटक व उंदीर प्रतिबंधक उपाययोजना पूर्णपणे अकार्यक्षम असणे या बाबीही समोर आल्या. उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या अर्धवार्षिक तपासणीच्या नोंदी तसेच पॅकेजिंग साहित्य अन्नपदार्थांसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्रही व्यवस्थापनाला सादर करता आले नाही. प्रयोगशाळा अहवालानंतर होणार पुढील कठोर कारवाई अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलम ३८(१)(सी) अंतर्गत हा सर्व तेलाचा साठा सील करून पुढील आदेशापर्यंत सुरक्षित ताब्यात ठेवण्यात आला आहे. जप्त केलेल्या तेलाचे नमुने तात्काळ शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत डरकळे यांनी दिली. या कारवाईमुळे लासूर स्टेशन व परिसर परिसरातील खाद्यतेलाची गुणवत्ता आणि अन्न सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता प्रयोगशाळेचा अहवाल काय येतो आणि त्यानुसार पुढे कोणती कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *