Headlines

अनाड शिवारात विहिरीत पडलेला बिबट्या दीड तासाने काढला बाहेर:पाण्यासाठी भटकंती: अजिंठा वन विभागाच्या पथकाने राबवले बचावकार्य‎




सोयगाव तालुक्यातील अनाड शिवारात पाण्याच्या शोधात भटकंती करणारा एक बिबट्या शेतातील विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. अजिंठा वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दीड तास बचावकार्य राबवून बिबट्याला विहिरीतून १०.३० वाजता सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, अजिंठा राखीव जंगलातील सुमारे एक वर्ष वयाचा बिबट्या गुरुवारी रात्रीच्या सुमारास पाण्याच्या शोधात भटकत होता. पाण्याचा शोध घेत असताना तो अनाड शिवारातील विकास रोहिदास राठोड यांच्या गट क्रमांक २११ मधील शेतातील विहिरीत पडला. शुक्रवारी सकाळी शेतकरी विकास राठोड शेतात गेले असता त्यांना विहिरीत पडलेला बिबट्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ अजिंठा वनविभागाला या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रवीण गवळी, वनरक्षक गणेश दांडगे, जीवन दांडगे, विजय देवकर, समाधान मोरे, दिनेश वाघ, योगेश साळवे आणि अशोक दांडगे इत्यादी वनकर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. वनकर्मचाऱ्यांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य राबवले आणि बिबट्याला विहिरीतून सुरक्षितपणे बाहेर काढले. रेस्क्यूनंतर या बिबट्याला सध्या अजिंठा वनविभागाच्या कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. अजिंठा राखीव जंगल परिसरात पाण्याचे स्रोत दिवसेंदिवस आटत चालल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती वाढली असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. जंगलात पाण्याच्या सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *