![]()
मुंबईतील घाऊक, किरकोळ बाजारात ‘ग्रीन क्रॅकर्स’च्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण बंदी घातलेल्या अतिविषारी ‘बेरियम’चा वापर करून फटाक्यांची सर्रास विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला. ‘आवाज फाउंडेशन’ने मुंबई व कुर्ला बाजारातून खरेदी केलेल्या १७ प्रकारच्या फटाक्यांची चेंबूर येथील आरसीएफ मैदानावर प्रत्यक्ष रासायनिक चाचणी केली. यात ९ नमुन्यांमध्ये विषारी बेरियम आढळले. ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी पाकिटांवर बनावट क्यूआर कोड छापल्याचेही उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर आवाज फाउंडेशनच्या प्रमुख सुमैरा अब्दुलअली यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून फटाक्यांचे वितरण, साठा आणि विक्रीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उत्पादक आणि घाऊक विक्रेत्यांच्या साखळीवर वेळेत कारवाई न झाल्यास मुंबईतील हवेचा दर्जा अतिधोकादायक पातळी गाठेल, असे फाउंडेशनचे म्हणणे आहे. फटाक्यांच्या पाकिटांवर ‘नीरी ॲडिटिव्ह’ असा खोटा दावा करून आत घातक रसायने भरल्याचे चाचणीत निष्पन्न झाले. तपासणी केलेल्या १७ पैकी १२ फटाक्यांवर क्यूआर कोड होते. मात्र, त्यातील ६ फटाक्यांचे कोड स्कॅनच झाले नाहीत; ते पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित ५ फटाक्यांवर कोणताही क्यूआर कोड नव्हता. ‘टिम टिम फ्लॉवर पॉट’, ‘रेनबो फॉग’ आणि ‘स्कार्लेट सॉसर’ या ब्रँड्सचे क्यूआर कोड अवैध ठरले. केवळ वनिता फायरवर्क्सच्या‘टॉप कोड’, ‘पॉवर पॉइंट’,‘ऑटोग्राफ’ या उत्पादनांचे कोड वैध आढळले. बेरियममुळे दम्याचा झटका आरोग्य अलर्ट : बेरियमच्या धुरामुळे श्वसननलिका आकुंचन पावून तीव्र दम्याचा झटका येतो. लहान मुले व ज्येष्ठांमध्ये ऑक्सिजनची पातळी खालावणे व हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होतो. खरा पर्यावरणपूरक फटाका कसा ओळखाल? : मोबाइलच्या नेहमीच्या कॅमेऱ्याने तपासणी न करता केवळ ‘नीरी’च्या (सीएसआयआर-नीरी) अधिकृत ॲप्लिकेशनद्वारेच सांकेतिक खूण (क्यूआर कोड) तपासा. कोड तपासल्यानंतर उत्पादक कंपनीचे नाव आणि परवाना क्रमांक दिसणे आवश्यक आहे. काही त्रुटी (एरर) आढळल्यास तो फटाका बनावट समजावा. ११ फटाक्यांवर डेसिबलचा उल्लेखच नाही मोहंमद अली रोड आणि कुर्ला बाजारातून ९ व १० ऑक्टोबर रोजी खरेदी केलेल्या फटाक्यांची चेंबूरच्या आरसीएफ मैदानावर चाचणी घेण्यात आली. त्यात ‘सर्पंट एग बिग’ या फटाक्यात सर्वाधिक २७.४० टक्के तर ‘पूजा प्लेन’मध्ये १३.६१ टक्के बेरियम निष्पन्न झाले. ‘कलर कोटी’, ‘लिओ’आणि ‘किंग विनर डिलक्स’च्या पाकिटांवरही बेरियम सापडले. ११ फटाक्यांवर आवाजाची मर्यादाच (डेसिबल पातळी) नमूद नव्हती.
Source link
सुप्रीम कोर्टाचा आदेश धाब्यावर:‘ग्रीन क्रॅकर्स’ म्हणून मुंबईत घातक फटाके, 17 पैकी 9 फटाक्यांत बेरियम; बनावट क्यूआर कोडचा वापर