Headlines

आई राजा उदो उदो::मनमोहक तांदळा ते हरि-हराचे स्थान, श्रद्धा, परंपरा आणि सेवाभाव!; संभाजीनगरातील रेणुका मातेची साठा उत्तराची कहाणी…!




एखाद्या मंदिराची ओळख केवळ गाभाऱ्यातील मूर्तीपूर्ती मर्यादित नसते; तर मंदिराभोवती विणल्या गेलेल्या कथांशीही संबंधित असते. असेच आपल्या शहरातील बीड बायपास या ठिकाणचे रेणुका मातेचे मंदिर आहे. जिथे भाविक मोठ्या संख्येने आपले गाऱ्हाणे सांगायला देवीच्या चरणी येतात. देवीचे मनमोहक रूप पाहून सारे दुःख दूर होते. तसं पाहायला गेलं तर शहरामध्ये अनेक देवीची मंदिर आहेत. मात्र या मंदिराचे वैशिष्ट्य नेमके काय? मंदिराचा इतिहास आणि हे मंदिर स्थापन कसे झाले? जाणून घेऊयात या स्पेशल स्टोरीमधून… मंदिराची रचना आणि परिसर रेणुका माता मंदिरात प्रवेश करताच भव्य सभामंडप लक्ष वेधून घेतो. सभामंडपातील खांबांवर केलेले नक्षीकाम मंदिराच्या सौंदर्यात भर घालते. मंदिराचा परिसर सुमारे तीन हजार चौरस फुटांमध्ये विस्तारलेला असल्याची माहिती आहे. येथे भाविकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, नवरात्रोत्सवाच्या काळात दूरदूरवरून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. सभामंडपातून पुढे जाताच देवीचा मनमोहक तांदळा नजरेस पडतो. त्या क्षणी सभोवतालचा गजबजाट विसरून भाविकांचे लक्ष देवीच्या दर्शनावर केंद्रित होते. मंदिराची स्थापना रेणुका माता मंदिराची स्थापना 1998 मध्ये अण्णा महाराज यांनी केली. असे सांगितले जाते की अण्णा महाराज बीड बायपास परिसरात एका झोपडीत वास्तव्यास होते. त्या ठिकाणी त्यांनी अनुष्ठान केले आणि त्यानंतर रेणुका मातेची स्थापना केली. अण्णा महाराजांनी देशातील विविध देवीस्थानांना भेटी दिल्या आणि काही लुप्त झालेल्या देवस्थानांच्या जीर्णोद्धारासाठी कार्य केले. सुरुवातीला देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर कालांतराने मंदिराची रचना बदलली आणि भव्य असे मंदिर तयार झाले. मंदिरातील सेवेकरी नंदू अदवंत म्हणतात, ‘नाथपरंपरेचा आध्यात्मिक वारसा जपणारे हे मंदिर आहे. कर्नाटक शैलीतील बांधकाम, आकर्षक नक्षीकाम आणि सुशोभीकरण ही मंदिराची वैशिष्ट्ये आहेत. सद्‍गुरू अण्णा महाराज यांनी १९९४ मध्ये सातारा परिसरात पर्णकुटीत रेणुकामातेची स्थापना केली होती. १९९८ मध्ये देवीची मंदिराच्या प्रांगणात स्थापना करण्यात आली. कालांतराने मंदिराची झीज झाल्याने सद्गुरू अप्पा महाराज यांच्या संकल्पनेतून जीर्णोद्धार करण्यात आला.’ पुढे ते सांगतात, ‘रेणुकामातेच्या मूर्तीसाठी ८५ किलो मेण वापरण्यात आले असून, राजस्थानमधील नाथद्वार येथील मीनावर्कचे डोळे बसविण्यात आले आहेत. मंदिर परिसरात ध्यानमंदिर आणि १६ फूट उंचीचा सभामंडप उभारण्यात आला आहे. सद्गुरू अण्णा महाराज यांनी सगुण उपासनेच्या माध्यमातून भक्तिमार्गाचा प्रसार केला. सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या भाविकांना जोडणारे हे शक्तिपीठ लोककल्याण आणि सामाजिक बांधिलकीसाठीही ओळखले जाते. नूतन मंदिरातील गुरुपीठामध्ये वेदपाठशाळा, अन्नछत्र, गोशाळा, सामूहिक उपासना, ऑनलाइन गीता अध्ययन वर्ग आणि बालसंस्कार शिबिर असे उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. तसेच येथे नवरात्रामध्ये नऊ दिवस विविध कार्यक्रम चालू आहेत.’ हरि-हराचे अनोखे स्थान रेणुका माता मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे हरि आणि हर या दोन्ही देवतांची स्थाने आहेत. देवीच्या तांदळ्याच्या खाली तळघरात महादेवाची पिंड असून त्याच्या अगदी वर पांडुरंगाचे स्थान आहे. मंदिराच्या अधिकृत वेबसाइटनुसार, अमृत महोत्सव सोहळ्यानंतर हंसतीर्थ स्वामी महाराज (म्हणजे पूर्वाश्रमीचे पू हरिहरानंद महाराज) औरंगाबादला वास्तव्य असताना 1996 मध्ये मंदिराची पायाभरणी झाली. स्वामींनी स्वतः मंदिर आराखडा तयार केला व त्या प्रमाणेच भव्य मंदिर उभे रहिले. या स्थानास “हरिहर” नाव द्यावे असे शिष्य मंडळींचे आग्रहाचे म्हणणे होते. परंतु स्वामी पूर्ण विरक्त आणि संन्यासी !! “मी, माझे कुणी नाही, सारी भगवतीची कृपादृष्टी!” हा भाव ठेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात हर म्हणजे महादेव पिंड आणि हरि म्हणजे पांडुरंग या दोन देवतांची विधीपूर्वक स्थापना केली. येथेही भव्य असा संभामंडप आहे. अण्णा महाराजांनंतर त्यांचे पुत्र सद्गुरू अप्पा महाराज यांनी गुरुपरंपरेची जबाबदारी सांभाळली. 2025 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार आणि रेणुका माता मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अप्पा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. देवीचे मनमोहक रूप मंदिरातील रेणुका मातेचा तांदळा अतिशय मनमोहक आहे. देवीचे बोलके नेत्र, नाजूक नथ, विविध अलंकार, भाळी शोभणारे मोठे कुंकू तिच्या सौंदर्यात भर घालते. तसेच देवीच्या मागे असलेल्या प्रभावळीमुळे तिचे रूप अधिक सुंदर बनते. देवीच्या या तेजस्वी आणि प्रसन्न रूपावर भाविकांची नजर खिळून राहते. तिच्या दर्शनाने मन भक्तिभावाने भरून येते. प्रत्येक भाविकासाठी मातेचे हे रूप केवळ दर्शनापुरते मर्यादित नसून, ते श्रद्धा, आस्था आणि मानसिक समाधानाची अनुभूती देणारे आहे. गोशाळा आणि अण्णा महाराजांची कुटी मंदिराच्या मागील बाजूस गोशाळा असून, तेथे सध्या 15 ते 16 गायी आहेत. गोशाळेच्या शेजारीच अण्णा महाराजांची कुटी उभारण्यात आली आहे. मंदिराच्या धार्मिक वातावरणाशी जोडलेली ही जागा अण्णा महाराजांच्या वास्तव्याच्या आठवणी जपणारी आहे. याविषयी मंदिरात सेवा करणारे नंदू अदवंत सांगतात, “मी येथे गेल्या अनेक वर्षांपासून सेवा करत आहे.” नवरात्रोत्सव आणि धार्मिक कार्यक्रम नवरात्रोत्सवाच्या काळात रेणुका माता मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तन, आरती, गोंधळ तसेच शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम या उत्सवाची रंगत वाढवतात. याशिवाय नवचंडी याग, देवीचा अभिषेक आणि श्रीमद् देवी भागवताचे आयोजनही केले जाते. या कार्यक्रमांमध्ये अनेक भाविक सहभागी होतात. काही भाविक दर्शनासाठी येतात, तर काही जण सेवाकार्यातही योगदान देतात. उत्सवाच्या काळात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. त्यांपैकी गुरुपौर्णिमेचा उत्सव विशेष महत्त्वाचा मानला जातो. सद्गुरूंची सेवा, गुरुभक्ती आणि गुरुपरंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या सोहळ्याचा मुख्य भाव आहे. या उत्सवात शिष्य आणि भाविक सहभागी होऊन गुरूंचे पूजन करतात आणि आशीर्वाद घेतात. धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक उपक्रमांनाही मंदिरात महत्त्व दिले जाते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि अन्नदान यांसारखे उपक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे मंदिराचे कार्य केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रमांशीही जोडलेले असल्याचे दिसून येते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *