![]()
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आष्टापूर येथील एका शेतातून सुमारे ४० टन ऊस चोरी झाल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चोरी झालेल्या उसाची अंदाजे किंमत ८८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुंढवा परिसरात राहणाऱ्या अनिल चंद्रकुमार कामठे यांच्या कुटुंबाच्या मालकीची आष्टापूर येथील गट क्रमांक ८२२ मध्ये शेतजमीन आहे. कामठे आणि त्यांचे दोन भाऊ या जमिनीची शेती करतात. शेतात सुमारे ५५ गुंठे क्षेत्रावर सात महिन्यांपूर्वी उसाची लागवड करण्यात आली होती. कामठे यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने ते आणि त्यांचे भाऊ मुंढवा येथील घरी गेले होते. याच कालावधीत २० ते २३ ऑगस्टदरम्यान अज्ञात व्यक्तींनी मजुरांच्या मदतीने शेतातील ऊस तोडून चोरून नेला. या घटनेबाबत कामठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नवनाथ लक्ष्मण कोतवाल (वय २९, रा. पवारवाडी, आष्टापूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने योगेश पोपट गव्हाणे (वय २५, रा. रामकृष्ण मंगल कार्यालयामागे, आष्टापूर) याच्या मदतीने मजूर लावून ऊस तोडल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त अविनाश कुमार आणि सहायक पोलिस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती डंबाळे करत आहेत.
Source link
आष्टापूरमध्ये 40 टन ऊस चोरी:लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना केली अटक