Headlines

उद्धव ठाकरेंचा भगव्याशी संबंध राहिलेला नाही:गिरीश महाजनांचा हल्लाबोल, म्हणाले- कुंभमेळ्यात AI सुरक्षेचा वापर करणार




“जेव्हा तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हाच तुम्ही विचार सोडले. त्यामुळे तुमच्याकडे आता भगवा शिल्लकच राहिलेला नाही, अशा आक्रमक शब्दांत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच, आगामी कुंभमेळ्याची तयारी, लॉरेन्स बिश्नोई प्रकरण आणि मनोज जरांगे यांनी केलेले ५०० कोटींचे आरोप या सर्वच मुद्द्यांवर महाजन यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केले. ‘ठाकरेंचा भगव्याशी आता संबंध नाही’: उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवर भगवा फडकवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा महाजन यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, “तुमचा कुठे भगवा आहे? आता जो भगवा फडकतोय तो खऱ्या शिवसेनेचा, म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. तुम्ही छोट्याशा मोहापायी आणि खुर्चीसाठी आम्हाला सोडून काँग्रेसकडे गेलात, तेव्हाच हिंदुत्व सोडले. म्हणूनच ४० आमदारांनी तुमची साथ सोडली. तुमचे लांगूलचालन लोकांना माहीत आहे.” ‘राऊतांना विसंगत आणि भडक बोलण्याची सवय’ ‘बिश्नोईच्या नावाने आगामी काळात राजकीय हत्या होतील’, या संजय राऊतांच्या दाव्यावरही महाजन यांनी प्रत्तुत्तर दिले. म्हणाले, मनसुख हिरेन यांची हत्या त्यांच्याच काळात झाली होती, तेव्हा आम्ही असा दावा केला होता का? राऊतांना केवळ अपप्रचार करायचा असतो आणि असंबंधित, भडक बोलायची सवय लागली आहे,” असा टोला महाजन यांनी लगावला. ५०० कोटींच्या आरोपांवर स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपये दिल्याच्या (मनोज जरांगे यांच्या) आरोपांवर बोलताना महाजन म्हणाले की, “हे आरोप पूर्णपणे निराधार आणि विसंगत आहेत. याला कोणतेही तथ्य किंवा हातपाय नाहीत. कोण कशासाठी ५०० कोटी देणार? एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीवर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी होत असल्याबद्दल विचारले असता, “आपल्या नेत्याने मुख्यमंत्री व्हावे असे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटणे साहजिक आहे. राष्ट्रवादीच्या लोकांना त्यांच्या नेत्याबद्दल वाटते, तसे शिंदे गटाला वाटते. यात काही गैर नाही, आमचे तिन्ही पक्षांचे सरकार मिळून काम करत आहे,” असे महाजन यांनी स्पष्ट केले. ट्रेनमधील सुरक्षा आणि पोलिसांचे कौतुक लॉरेन्स बिश्नोई टोळीतील शूटर्सनी ट्रेनने हत्यारे आणल्याच्या मुद्द्यावर महाजन म्हणाले, “सध्या रेल्वे स्थानकांवरील प्रचंड गर्दीमुळे प्रत्येक प्रवाशाची बॅग आणि खिसा तपासणे व्यावहारिकदृष्ट्या कठीण आहे. मात्र, भविष्यात सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टर आणि कठोर तपासणीसारखे उपाय योजणे गरजेचे झाले आहे. असे असले तरी, मुंबई पोलिसांनी अत्यंत कमी वेळेत परराज्यातून आरोपींना शिताफीने पकडले, यासाठी त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे.” कुंभमेळ्यासाठी ‘AI’ आणि अत्याधुनिक सुरक्षेचा वापर आगामी कुंभमेळ्याच्या तयारीबाबत माहिती देताना महाजन म्हणाले, “ऑगस्टमध्ये होणाऱ्या अमृतस्नानासाठी आम्ही सज्ज आहोत. सुरक्षेसाठी अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) चा वापर केला जाईल. देशभरातील सुरक्षा यंत्रणा यावर काम करत आहेत.” कुंभमेळ्यातील ध्वजारोहणासाठी राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आले असून, त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. तसेच, मुख्य कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेत्यांनाही आमंत्रित केले जाणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. ————————– हेही वाचा.. बाप दाखवायची भाषा करणाऱ्यांची उद्या 11 वाजता कळेल: 500 कोटींच्या कुजबुजीत 2 माजी मुख्यमंत्र्यांची नावे; रामदास कदमांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर “दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमच्यावर ओरडणारे आणि बाप दाखवायची भाषा करणारे नेते आता कितीही थयथयाट करत असले, तरी उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन भाजपमधील ती सर्व कुजबुज पुराव्यासह महाराष्ट्रासमोर मांडणार आहे. या 500 कोटींच्या संपूर्ण कटात दोन माजी मुख्यमंत्र्यांची नावे असून, त्यात अत्यंत शुद्ध मराठी आणि हिंदी बोलणाऱ्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. उद्या 11 नंतर खरी औकात कोणाची आहे आणि खरा बेइमान कोण, हे महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट दिसेल,” असा जोरदार पलटवार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *