![]()
“लोकशाहीमध्ये ‘रेझिम चेंज’ होणे ही एक अत्यंत स्वाभाविक आणि घटनात्मक प्रक्रिया आहे. देशातील कोणत्याही सक्षम विरोधकांचे मुख्य उद्दिष्ट हे जनतेच्या हितासाठी सरकार बदलण्याचेच असते. मात्र, हा बदल निष्पक्ष निवडणूक आयोग, लोकशाही संस्थांचे पावित्र्य आणि जनतेचा विश्वास जिंकून मतपेटीच्या माध्यमातून झाला पाहिजे. पक्ष फोडून, चिन्ह चोरून आणि मतदारांचा कौल डावलून सत्तेत येणे ही भाजपची विकृत कार्यपद्धती आहे,” असा सणसणीत टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या तथा राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी लगावला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या ‘रेझिम चेंज’च्या विधानावरून सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या टीकेला नवी दिल्लीत वृत्तसंस्थेशी बोलताना प्रियांका चतुर्वेदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला गुजरातमधील साबरमती तुरुंगात मिळणारे कथित संरक्षण, शांततापूर्ण आंदोलनांवर होणारा लाठीमार आणि महिला आरक्षणावरील राजकीय ढोंगीपणावर अत्यंत परखड मते मांडली. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही भाजपची पद्धत; लोकशाहीत मतपेटीनेच सत्ता बदलते! ‘रेझिम चेंज’वरून महायुती आणि भाजप नेत्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर चतुर्वेदी म्हणाल्या, “कोणत्याही लोकशाही देशात विरोधकांनी सत्तेतील सरकार बदलण्याचा प्रयत्न करणे यात काहीही गैर नाही. जनतेचा कौल घेऊन, निवडणुका जिंकून सत्तेत येणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. मात्र, भाजप संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला बगल देऊन आमदार फोडणे, पक्ष फोडणे आणि मूळ पक्षचिन्ह चोरून सरकारे बनवण्याचे काम करते. सत्तापालटासाठी कोणीही हिंसेचा किंवा जाळपोळीचा मार्ग अवलंबत असेल तर ते 100% चुकीचे आहे; लोकशाहीत बदलाचे माध्यम केवळ मतपेटीच असायला हवे.” साबरमती तुरुंगातून बॉलिवूडवर दहशत उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या आव्हानाचा संदर्भ देत त्यांनी गंभीर सवाल उपस्थित केले. “गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई जोपर्यंत गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद आहे, तोपर्यंत इतर कोणत्याही राज्याचे पोलीस त्याची चौकशी करू शकत नाहीत किंवा त्याला तपासासाठी ताब्यात घेऊ शकत नाहीत. त्याला नक्की कोणत्या यंत्रणेचे आणि कोणाचे संरक्षण मिळत आहे?” तुरुंगातून टोळीचे संचालन “तुरुंगाच्या 4 भिंतींच्या आत बसून तो संपूर्ण गँग चालवतो, बॉलिवूडमधील नामांकित कलाकारांवर आणि सार्वजनिक व्यक्तींवर हल्ले घडवून आणतो. मुंबई पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तात्काळ साबरमती तुरुंगातून लॉरेन्स बिश्नोईला मुंबईत आणण्यासाठी हालचाली केल्या पाहिजेत.” विरोधकांना लगेच देशद्रोही ठरवणार का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानांवर आणि आंदोलनांवर बोलताना चतुर्वेदी यांनी केंद्राला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला. “देशाच्या प्रगतीसाठी काम करण्याचा दावा प्रत्येक राजकीय पक्ष करतो. जेव्हा जेव्हा देशावर संकट आले, युद्धाचा प्रसंग उद्भवला किंवा गलवान खोऱ्यात चीनसोबत संघर्ष झाला, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक एकत्र खांद्याला खांदा लावून उभे राहिले.” शांततापूर्ण आंदोलनांचा गळा घोटू नका “संविधान आपल्याला शांततेच्या मार्गाने आंदोलन आणि निदर्शने करण्याचा पूर्ण अधिकार देते. मात्र, आज आपल्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला थेट ‘बेकायदेशीर’ किंवा ‘देशविरोधी’ ठरवले जाते. शांततापूर्ण आंदोलकांवर अश्रुधूर सोडणे आणि अमानुष लाठीमार करणे म्हणजे स्वतःच आपल्या लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे.” महिला सशक्तीकरणाच्या केवळ पोकळ गप्पा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) केलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशभरातील पितृसत्ताक व्यवस्थेवर आणि महिलांच्या सुरक्षेवर बोट ठेवले. “आज देशामध्ये प्रत्येक विषयाचे राजकीय विभाजन झाले आहे. एका बाजूला भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांचे प्रकरण असो, किंवा दुसरीकडे मणिपूरमधील खासदाराशी संबंधित घटना असो; यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई का झाली नाही? महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा प्रश्न येतो, तेव्हा सर्व राजकीय पक्षांनी आपापले राजकीय अजेंडे बाजूला ठेवले पाहिजेत.” आरक्षण देण्याबाबत टाळाटाळ “प्रत्येक राजकीय पक्ष तोंडाने महिला सशक्तीकरणाच्या मोठ्या गप्पा मारतो, मात्र अंतर्गत व्यवस्थेत महिलांशी दुजाभावच केला जातो. महिला आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र ‘डिलिमिटेशन’चे कारण पुढे करून 2029 पर्यंत ही प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली. जर खरोखरच महिलांचे सबलीकरण करायचे होते, तर हे आरक्षण तात्काळ का लागू केले नाही?” असा थेट सवाल प्रियांका चतुर्वेदी यांनी शेवटी विचारला. ——————————————————– हेही वाचा… अमित शहाच लॉरेन्स बिश्नोईचे खरे सूत्रधार!: संजय राऊतांचा पुन्हा आरोप; म्हणाले- 500 कोटींवरून शिंदेंना EDने समन्स पाठवावे, हरदीप पुरींच्या फोटोंवरून ‘रेझिम चेंज’चा पुनरुच्चार “देशभरातील गुन्हेगारी टोळ्या आणि माफियांचे जाळे भारतीय जनता पक्षाच्या छत्राखाली आणण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. गुजरातच्या साबरमती तुरुंगातून गँग चालवणारा लॉरेन्स बिश्नोई हा केवळ बाहुले असून, त्यामागील खरा चेहरा अमित शहा यांचाच आहे. देशात आता विरोधकांना संपवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगचा वापर राजकीय हत्यांसाठी होऊ शकतो,” असा अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
लोकशाहीत सत्तापालट हा जनतेचा अधिकार:पक्ष फोडणे ही भाजपची विकृती, साबरमतीत बिश्नोईला कोणाचे संरक्षण?; प्रियांका चतुर्वेदींचा थेट प्रहार