![]()
देशासह पुण्यातही विजया दशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विविध कार्यक्रम आणि पथसंचलन पार पडले. यानिमित्ताने भाजपच्या अनेक मंत्र्यांनी बॅनर्स लावले होते. पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लावलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राशेजारी संघ संस्थापक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर यांचे फोटो लावण्यात आले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी तीव्र आक्षेप घेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना थेट इशारा दिला आहे. रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, खासदार मुरलीधर मोहोळ यांचा मी जाहीर निषेध करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत हेडगेवार आणि गोळवलकरांचे फोटो लावण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. शिवरायांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही, मग तुम्ही हे सातत्याने का करत आहात? जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अवमान करत राहिलात, तर आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाही. भाजपच्या प्रतिनिधींकडे मेंदू असेल आणि तुम्ही शिकलेले असाल, तर वेळीच जागृत व्हा आणि शिवरायांचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्या. जर अशीच वागणूक सुरू राहिली, तर आम्हाला वेगळ्या मार्गाने उत्तर द्यावे लागेल. भाजपकडून मिळणाऱ्या वागणुकीवर खंत रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना भाजपकडून आम्हाला जी दुजाभावाची वागणूक मिळत आहे, ती आता लपून राहिलेली नाही. भाजपकडून मिळणाऱ्या या वागणुकीबाबतची माहिती आम्ही सातत्याने पक्षश्रेष्ठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना दिली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना 13 वर्षे ज्या व्यक्तीवर विश्वास टाकून चालव, तीच व्यक्ती आता वेगळे पॅनल तयार करत आहे. त्यांना जर भाजपची फूस किंवा मदत मिळत असेल, तर या सर्व गोष्टींना सामोरे जात जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पदवीधर निवडणुकीत आम्हाला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केला जातो आणि तो आमच्यावर लादला जातो. मित्रपक्ष म्हणून सोबत बसलो असतानाही जर आम्हाला सातत्याने अशी दुय्यम वागणूक दिली जात असेल, तर आमच्या मनात याविषयी मोठी खंत कायम आहे.
Source link
शिवाजी महाराजांचा अवमान कराल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही:रुपाली ठोंबरेंचा मुरलीधर मोहोळांना इशारा, म्हणाल्या- महाराजांच्या विचारांचा सन्मान करायला शिका