Headlines

वेसावे ते भाईंदरचा प्रवास आता केवळ 15 ते 20 मिनिटांत!:'मुंबई किनारा रस्ता' प्रकल्पाच्या कामाला वेग




मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी सोडविण्‍यासाठी व सुगम, अखंड प्रवासाच्या उद्देशाने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारा रस्‍ता (उत्‍तर) हा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्‍प हाती घेतला आहे. संपूर्ण मुंबईचा किनार पट्टा यामुळे एकमेकांना जोडला जाणार आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्‍पस्‍थळास प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले. मुंबई किनारा रस्‍ता (उत्‍तर) हा मेगा प्रकल्‍प आंतरबदल व जोडरस्‍त्‍यासह सुमारे 60 किलोमीटरचा असून वेसावे – भाईंदर ही नगरे किनारा रस्‍त्‍याने जोडली जाणार आहेत. त्‍यामुळे वेसावे ते भाईंदर प्रवासाचा कालावधी 90 ते 120 मिनिटांवरून केवळ 15 ते 20 मिनिटांवर येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर भाईंदर जोड रस्‍ता (DBLR) अशा एकूण सात टप्प्यांमध्ये (Package) विभागण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुहेरी उन्‍नत मार्ग (Double Elevated Roads), खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्‍ता (Roads on Stilts), २ केबल आधारीत पूल (Cable Stayed Bridge), 4 बास्‍केट पूल, सुमारे 15 मीटर व्‍यासाचे 2 जुळे बोगदे (Twin Tunnels) आणि 10 आंतरबदल (Interchanges) अशा विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. पॅकेज सी मध्‍ये माईंडस्‍पेस मालाड ते चारकोप खाडीदरम्‍यान उत्‍तर दिशेने जाणा-या 3.9 किलोमीटर लांबीच्‍या बोगद्याचा आणि पॅकेज डी मध्‍ये चारकोप खाडी ते माईंडस्‍पेस मालाड दरम्‍यान दक्षिण दिशेने जाणा-या 3.9 किलोमीटर लांबीच्‍या जुळ्या बोगद्यांचा (Twin Tunnels) विकसनाचा समावेश आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी या दोनही पॅकेज अंतर्गत येणा-या कामांची प्रत्‍यक्ष पाहणी केली. चारकोप येथे बोगद्याच्या बांधकामासाठी शाफ़्ट उभारण्यात येणार असून त्यासाठी 65 मीटर × 40 मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर खोदकाम सुरू करण्यात आले असून पायलिंगचे काम सुरु आहे. बोगदा खणन सयंत्राचे (TBM) सुटे भाग डिसेंबर 2026 मध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर पुढील दोन महिन्यात बोगदा खणन सयंत्राचे सुटे भाग जुळवाजुळव (Assembly) प्रक्रिया पूर्ण करून बोगद्याचे खोदकाम सुरू करणे अपेक्षित आहे. तर, जून महिन्यात दुसऱ्या बोगदा खनन यंत्राची जुळवाजुळव (Assembly) पूर्ण करून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू केले जाईल. या किनारा रस्ते प्रकल्पाची कामे गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश बांगर यांनी दिले. प्रमुख अभियंता (रस्‍ते व वाहतूक) मांतय्या स्‍वामी, कार्यकारी अभियंता वैभव गांधी, संबंधित अभियंते, सल्‍लागार यावेळी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *