![]()
नागपूरमधील वाडी उड्डाणपुलाजवळ झालेल्या रस्ते अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि विचारवंत मिलिंद कीर्ती यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. 13 ऑक्टोबर रोजी हा अपघात झाला होता. यानंतर कीर्ती यांना उपचारासाठी तातडीने रामदासपेठ येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती आणि अत्यंत चिंताजनक अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ‘लोकमत’ ‘लोकशाही वार्ता’ तसेच ‘टीव्ही 9 मराठी’मध्ये वरिष्ठ पत्रकार म्हणून काम केलेले मिलिंद कीर्ती हे पत्रकारिता, साहित्य आणि वैचारिक क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी सर्वत्र ओळखले जात होते. तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभाव आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम यांसारख्या विविध विषयांवर भाष्य करणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. यातील ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग : तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग : सहमतीची हुकूमशाही ॲरिस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी’ ही दोन पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत. मिलिंद कीर्ती यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन ‘प्लॉट नं. 103, गल्ली क्र. 6, जुने ज्ञानेश्वर नगर, मानेवाडा रोड, नागपूर’ येथे आयोजित करण्यात आले. त्यानंतर, आज बुधवार, दिनांक 14 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता मानेवाडा घाट येथे अंतिम विधी (अंत्यसंस्कार) पार पडतील.
Source link
ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कीर्ती यांचे अपघाती निधन:नागपुरातील वाडी उड्डाणपुलाजवळ झाला होता अपघात; उपचारादरम्यान अखेरचा श्वास