![]()
घरकामास ठेवलेल्या महिलेने सोन्याचे दागिने आणि रोकड असा सात लाख 84 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना कोरेगाव पार्क भागात घडली. या प्रकरणी महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घरकाम करणारी महिला माधुरी महादेव बनसोडे (रा. फैलावाली चाळ, घोरपडी गाव) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला कोरेगाव पार्क भागातील गल्ली क्रमांक पाचमधील एका सोसायटीत राहायला आहेत. आरोपी महिला त्यांच्याकडे घरकामास यायची. ज्येष्ठ महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून घरकाम करणाऱ्या महिलेने वेळोवेळी शयनगृहातील कपाटातून रोकड, तसेच सोन्याचे दागिने लांबविले. कपाटातून ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. घरकाम करणाऱ्या महिलेने ऐवज चोरल्याचा संशय महिलेने फिर्यादीत व्यक्त केला आहे. पोलिस हवालदार एन जाधव तपास करत आहेत. पीएमपी प्रवासी महिलेची दीड लाखांची बांगडी चोरी पीएमपी प्रवासी महिलेच्या हातातील दीड लाख रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 56 वर्षीय महिला धायरीतील डीएसके विश्व परिसरात राहायला आहेत. त्या 12 ऑक्टोबर रोजी स्वारगेट स्थानकातून पीएमपी बसने कात्रजकडे निघाल्या होत्या. बसमध्ये प्रवेश करताना गर्दीत चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कटरचा वापर करुन चोरली. बांगडी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस हवालदार सागर केकाण तपास करत आहेत
Source link
पुण्यात घरकाम करणाऱ्या महिलेनेच केले घरातील सोन्या-नाण्यावर हात साफ:कोरेगाव पार्क परिसरातून 7.84 लाखांचा ऐवज चोरीला