Headlines

वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह 24.24 लाखांचा मुद्देमाल जप्त:हिंगोलीच्या मकोडी शिवारातील घटना, तिघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




सेनगाव तालुक्यातील मकोडी शिवारात सेनगाव पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह 24.24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात रविवारी ता. 5 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाभरात अवैधवाळू उपसा व वाहतूक बंद करण्यासाठी पोलिस दलाची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी स्थानिक पोलिस ठाण्यांसोबतच गुन्हे शाखेची पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून दररोज अवैध वाळू उपसा व वाहतूकीची माहिती घेऊन कारवाई केली जात आहे. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील बोरखेडी शिवारातून अवैध वाळू उपसा करून दोन टिप्परमध्ये वाहतूक केली जात असून सदर टिप्पर मकोडी शिवारातून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादाल सुभाष चव्हाण, परमेश्‍वर क्षिरसागर, शेख यांच्यासह गृहरक्षक दलाच्या दोन जवानांनी शनिवारी ता. 4 रात्री मकोडी शिवारात भर पावसात वाहनांची तपासणी सुरु केली. यावेळी पोलिसांनी दोन टिप्पर थांबवून तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. पोलिसांनी टिप्पर चालकाकडे चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही तसेच वाळू वाहतूकीच्या पावत्याही दाखविता आल्या नाही. त्यामुळे पोलिसांनी दोन टिप्पर व वाळू असा 24.24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या तक्रारीवरून जनार्धन खताळ (रा. आडोळ), प्रकाश शिंदे (रा. सुकळी बुद्रूक), नामदेव पोले (रा. उमरदरी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार सुभाष चव्हाण पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *