![]()
कोविड काळात बळीराजाने जगाला तारले. आपल्या विकासाचा खरा जीडीपी हा कृषी आणि गावांमध्येच आहे. म्हणूनच ग्रामीण भारत थांबला तर देश थांबेल. म्हणून शहरांप्रमाणेच गावांच्या विकासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, स्थलांतर आणि त्यामुळे निर्माण होणारी मजूरटंचाई या समस्यांनी ग्रामीण भारत होरपळत आहे. त्यातुन बळीराजाला बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. असे मत बुलढाणा येथील कृषी विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार नाफडे यांनी व्यक्त केले. गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत गुरुवारी (दि. ७) ‘ग्रामीण भारत घडविताना : गावापासून राष्ट्रनिर्मितीकडे’ या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. व्याख्यानस्थळी पलक तांबोळी यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. अमितकुमार नाफडे म्हणाले, आपण जे अन्न खातो त्यावर चांगले संस्कार व्हायला हवे असे आपण सहज म्हणतो, परंतु हे अन्न पिकविणारा बळीराजाच समाधानी नसेल तर अन्न शिजवताना केल्या जाणाऱ्या संस्कारांचा काय उपयोग असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी आर्थिक दारिद्र्याशी झगडणाऱ्या ग्रामीण व्यवस्थेची वस्तुस्थिती मांडली. शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या राहत आहेत. हे चांगले चित्र असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. आजचे व्याख्यान वक्ते : समीर मित्रगोत्री,प्राध्यापक, अमेरीकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे विषय : भविष्यकालीन औषधांचा शोध आणि विकास वेळ : सायंकाळी ७ : १५ वाजता गाण्यांची मेजवानी व्याख्यानानंतर सुरभी गौड प्रस्तुत ‘एव्हरग्रीन हिटस्’ हा सर्वकालीन सदाबहार हिंदी गीतांचा रंगतदार कार्यक्रम झाला. यामध्ये सुरभी गौड- सूर्यवंशी व सहगायिका दीपा चंदे, शिल्पा छाजेड, डॉ. सुचेता वलसंगकर, पायल सावजी यांनी सुमधुर आवाजात गाणी सादर केली. त्यांना अमोल पालेकर, जितेंद्र सोनवणे, शुभम जाधव व रोहित कटारे यांनी संगीतसाथ केली.
Source link
विकासाचा खरा जीडीपी हा कृषी, गावांमध्येच:कृषी विकास संस्थेचे अमितकुमार नाफडे यांचे मत