![]()
जून महिन्याच्या सुरुवातीपासून ते जुलैच्या मध्यापर्यंत विदर्भातील पावसाची आकडेवारी समोर आली आहे. हवामान विभागाने 1 जून ते 13 जुलै 202६ या कालावधीसाठी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, विदर्भात सरासरीच्या तुलनेत 27 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. या दीड महिन्याच्या काळात विदर्भात सामान्यतः 299 मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ 218.9 मिमी पाऊस पडला आहे. यामुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शेतीकामांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विदर्भातील एकूण 11 जिल्ह्यांपैकी तब्बल 10 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट दिसून येत आहे, तर केवळ गोंदिया जिल्हा याला अपवाद ठरला आहे. गोंदियामध्ये या काळात सामान्य 352 मिमीच्या तुलनेत 407.5 मिमी पाऊस पडला असून, तिथे सरासरीपेक्षा 1६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. याउलट, गडचिरोली जिल्ह्याची स्थिती सर्वाधिक चिंताजनक असून तिथे सरासरीच्या तुलनेत तब्बल 53 टक्के घट झाली आहे. गडचिरोलीत एरवी 390.3 मिमी पाऊस पडतो, परंतु यंदा तिथे केवळ 184.5 मिमी पाऊस पडू शकला आहे. इतर प्रमुख जिल्ह्यांमध्ये उपराजधानी नागपूरमध्ये 237.६ मिमी पाऊस झाला असून सरासरीपेक्षा 21 टक्के कमी पाऊस पडला आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात 41 टक्के, वाशीममध्ये 35 टक्के, चंद्रपूरमध्ये 34 टक्के आणि अमरावतीमध्ये 24 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. वर्धा (13 टक्के), यवतमाळ (19 टक्के), अकोला (21 टक्के) आणि बुलढाणा (8 टक्के) या जिल्ह्यांमध्येही पावसाने सरासरी गाठलेली नाही. जुलै महिन्याचा अर्धा टप्पा पार होत आला तरी पावसाने दडी मारल्यामुळे किंवा अत्यंत कमी हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असून आता सर्वांचे डोळे आगामी काळातील दमदार पावसाकडे लागले आहेत.
Source link
विदर्भात सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पाऊस:गडचिरोलीत सर्वाधिक घट, तर गोंदियात सरासरी ओलांडली, 11 पैकी 10 जिल्हे 'कोरडे