Headlines

मुलुंड स्टेशनवर एसी लोकल अचानक बंद पडली:श्वास कोंडल्याने महिला प्रवासी बेशुद्ध, अनेक प्रवाशांना श्वास घेण्यासाठी त्रास




मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर सोमवारी सकाळी मुलुंड स्थानकात एसी लोकल अचानक बंद पडल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. सुमारे १५ मिनिटे ट्रेन प्लॅटफॉर्मवरच थांबून राहिल्याने आणि एसी यंत्रणा बंद झाल्याने डब्यांमध्ये प्रचंड उकाडा निर्माण झाला. दरवाजे बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर एक महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याने एकच गोंधळ उडाला. नेमके काय घडले?
सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी टिटवाळा रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी एसी लोकल सुटली होती. सोमवारची सकाळ आणि ऑफिसला जाण्याची वेळ असल्याने लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. साधारण ९.३० वाजताच्या सुमारास ही लोकल मुलुंड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर पोहोचली. मात्र, यावेळी लोकलमधील एक एसी युनिट अचानक बंद पडले आणि गाडी तिथेच थांबली. १५ मिनिटांचा थरार आणि महिला बेशुद्ध एसी लोकलचे दरवाजे स्वयंचलित असल्याने ते उघडले गेले नाहीत आणि एसी देखील बंद पडला. गाडीत पाय ठेवायलाही जागा नसताना ऑक्सिजनची कमतरता आणि वाढता उकाडा यामुळे प्रवाशांचा जीव गुदमरू लागला. तब्बल १५ मिनिटे गाडी जागीच उभी असल्याने प्रवाशांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. याच कोंडीत एक महिला प्रवासी बेशुद्ध होऊन डब्यातच कोसळल्या. आरपीएफ आणि सहप्रवाशांची धाव; मोठा अनर्थ टळला महिला बेशुद्ध पडत असल्याचे निदर्शनास येताच डब्यात एकच आरडाओरडा सुरू झाला. तत्काळ याची माहिती रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. आरपीएफ जवानांनी आणि सहप्रवाशांनी तातडीने मदत करत दरवाजे उघडून बेशुद्ध महिलेला आणि गुदमरणाऱ्या प्रवाशांना सुरक्षितपणे लोकलच्या बाहेर काढले, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कुर्ल्यात गाडी केली रिकामी;पुढील फेऱ्या नॉन-एसी या भीषण घटनेची दखल घेत रेल्वे प्रशासनाने सदर एसी लोकल कुर्ला स्थानकावर नेऊन पूर्णपणे रिकामी केली. त्यापुढील प्रवासासाठी सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना नॉन-एसी लोकलमधून जाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच, तांत्रिक बिघाडामुळे या लोकलच्या उर्वरित दोन फेऱ्या आता सुरक्षेच्या कारणास्तव ‘नॉन-एसी’ म्हणून चालवल्या जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, नेमका तांत्रिक बिघाड कशामुळे झाला याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, गर्दीच्या वेळेत एसी लोकल बंद पडल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हेही वाचा.. दिंडीवर काळाचा घाला:पंढरपूरच्या आषाढी वारीतील 7 वारकऱ्यांना ट्रकने उडवले, जेजुरीजवळ 3 महिला भाविकांचा मृत्यू, 4 जखमी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर आज सकाळी मोठा अनर्थ ओढावला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, चार वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *