Headlines

पुढचा विकास तुम्हाला तुमच्या बापाच्या पैशानेच करावा लागेल:मंत्री जयकुमार गोरेंचा खासदार विशाल पाटलांवर पलटवार




मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून सांगली जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार राडा सुरू झाला आहे. शासकीय कार्यक्रम होण्यापूर्वीच, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि खासदार विशाल पाटील यांनी या इमारतीचे ‘अनधिकृत’ उद्घाटन उरकून घेतले. या कार्यक्रमात बोलताना विशाल पाटील यांनी, “शासकीय निधी म्हणजे सत्ताधाऱ्यांना आपल्या बापाचा पैसा वाटतो,” अशी तिखट टीका केली होती. या टीकेला आता भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे तसेच पालकमंत्री सुरेश खाडे यांनी त्याच भाषेत सडेतोड उत्तर दिले आहे. “कधी कधी वाजंत्रीसुद्धा नवरदेव होण्याचा प्रयत्न करतात,” असा टोला लगावत गोरेंनी पाटलांवर पलटवार केला आहे. विशाल पाटलांचा नेमका आरोप काय होता? मिरज पंचायत समितीच्या इमारतीचे अनधिकृत उद्घाटन करताना विशाल पाटील यांनी प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. “शासकीय निधी हा जनतेचा आहे, पण सत्ताधाऱ्यांना वाटते की हा त्यांच्या वैयक्तिक इस्टेटीचा किंवा त्यांच्या बापाचा पैसा आहे.” “गेली तीन वर्षे इथे प्रशासक होता, त्या काळात मनमानी कारभार आणि मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ग्रामसेवकांना एकाच ठिकाणी 15-15 वर्षे ठेवून गावांची सत्ता चालवली जात आहे. उद्या राज्यात सत्तांतर झाल्यावर या सर्व भ्रष्टाचाराची 100% चौकशी होईल,” असा इशारा विशाल पाटील यांनी अधिकाऱ्यांना आणि सत्ताधाऱ्यांना दिला. जयकुमार गोरेंचा पलटवार- “कधी कधी वाजंत्रीही नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात” विशाल पाटलांच्या या टीकेचा खरपूस समाचार मंत्री जयकुमार गोरे यांनी शासकीय उद्घाटन सोहळ्यात घेतला. “ही पंचायत समिती सुरेशभाऊ खाडे यांनी मंजूर करून आणलेली आहे. त्यांच्या बापाने नाही आणली, पण तुमच्या बापाने काय चेक किंवा डीडी पाठवला होता का? इथे काही लोकांची अवस्था अशी झाली आहे की कधी कधी वाजंत्री पण नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात. पण वाजंत्र्यांचे काम नवरदेवाला फक्त स्टेजपर्यंत पोहोचवण्याचे असते, स्टेजवर चढायचे नसते.” गोरे पुढे म्हणाले, “जर तुम्हाला उद्घाटनाची एवढीच खुमखुमी असेल, तर खासदार झाल्यापासून खासदार फंडाव्यतिरिक्त एक नया रुपया तरी तुम्ही बाहेरून आणून दाखवा आणि मग रुबाब करा. जो काम करतो, त्याला श्रेय घ्यायला काहीच हरकत नाही.” “तुम्हाला विकास बापाच्याच पैशाने करावा लागेल” याच सोहळ्यात बोलताना सत्ताधाऱ्यांनी विशाल पाटलांच्या ‘बापाचा पैसा’ या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “कालचे उद्घाटन पूर्णपणे अनधिकृत होते. तिथे जिल्हा परिषदेचा एक शिपाईही उपस्थित नव्हता. हा पैसा पंकजा मुंडे मंत्री असताना मंजूर झाला होता. हा शासनाचा आणि जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे, तो कुणाच्या बापाचा नाही.” “विशाल पाटील हे खानदानी आहेत, त्यांचे आजोबा मोठे नेते होते. पण त्यांच्याकडून अशा भाषेची अपेक्षा नव्हती. घरातले पैसे घालून कुणी विकास करत नसते. पण त्यांनी ज्या प्रकारे ‘बापाच्या पैशाने बिल्डिंग बांधली का?’ असे म्हटले, त्यावर मी ठामपणे सांगतो की, आता इथून पुढे त्यांना त्यांच्या जिल्ह्याचा विकास त्यांच्या बापाच्याच पैशाने करावा लागेल, कारण त्यांच्याकडे तसेही उरले सुरले काहीच राहिलेले नाही,” असा घणाघात सत्ताधारी नेत्यांनी केला. मिरज पंचायत समितीच्या इमारतीचे श्रेय घेण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत सुरू झालेला हा संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. खासदार विशाल पाटील आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यात उडालेल्या या शाब्दिक चकमकीमुळे सांगलीच्या राजकारणात मोठा तणाव निर्माण झाला असून, आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *