Headlines

उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का?:14 ते 15 आमदार फुटण्याचा रामदास आठवलेंचा दावा; पुन्हा होणार 'ऑपरेशन टायगर'




ठाकरेंची साथ सोडून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या एका दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी ठाकरे गटातील 14 ते 15 आमदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. ’20 पैकी 14 ते 15 आमदार फुटू शकतात’ रामदास आठवले म्हणाले, “एनडीएमध्ये अनेक खासदार आणि नेते येत आहेत. आम्ही पक्ष फोडत आहोत, असे म्हणणे चुकीचे आहे. ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांचे खासदार आमच्याकडे आले आहेत. त्यांना स्वतःचे खासदार सांभाळता आले नाहीत.” ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर भाष्य करताना ते म्हणाले, “टायगर ऑपरेशन वगैरे काही नाही. त्यांचेच ऑपरेशन सुरू आहे. एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेना नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. महायुतीसोबत आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या 20 आमदारांपैकी 14 ते 15 आमदार फुटण्याची शक्यता आहे.” ‘उद्धव ठाकरे यांचे आमदार-खासदार आले तर स्वागतच’ ठाकरे गटातील आणखी लोक महायुतीत आले तर त्यांचे स्वागतच केले जाईल, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. ‘फडणवीसांची दिल्लीत गरज नाही’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य दिल्लीतील भूमिकेबाबत विचारले असता आठवले म्हणाले, “देवेंद्र फडणवीस 2029 पर्यंत केंद्रात जाणार नाहीत. ते महाराष्ट्रात सर्व घटकांना न्याय देत आहेत. त्यामुळे सध्या त्यांची दिल्लीत गरज नाही.” एकनाथ खडसेंना भाजपमध्ये घ्यावे भाजप नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची घेतलेल्या भेटीवर बोलताना आठवले म्हणाले, “जिल्ह्यात स्थानिक पातळीवरील वाद असतात. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा अमृत महोत्सव आहे. माझ्या मते त्यांना पुन्हा भाजपमध्ये घ्यायला हवे. त्यांची दिल्लीत जाण्याची इच्छा असेल तर पक्षाने त्याचा विचार करावा.” राज ठाकरेंवरही टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मराठी आणि हिंदीच्या भूमिकेवरही आठवले यांनी टीका केली. “राज ठाकरे हे सक्रिय नेते आहेत. त्यांना मराठीचा अभिमान आहे, आम्हालाही आहे. पण बाहेरून एखादे शिष्टमंडळ आले तर त्यांच्याशीही फक्त मराठीतच बोलायचे का? हिंदी बोलू नका, असे सांगणे योग्य नाही.” ते पुढे म्हणाले, “राज ठाकरे यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली आहेत. मराठी यायलाच हवी, पण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे देशभरातून लोक येतात. राज ठाकरे जितके आक्रमक होतील, तितकाच आमचा फायदा होईल.” ‘मुंबईची प्रतिमा खराब करू नये’ आठवले यांनी पुढे म्हटले, “मनसेचे लोक निवडून येत नाहीत, आमचे लोक निवडून येतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी एवढे आक्रमक होण्याची गरज नाही. मुख्यमंत्री हिंदीत बोलले म्हणून एवढा राग येण्याचे कारण नाही. मराठीच्या मुद्द्यावरून मुंबईची प्रतिमा खराब होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.” रामदास आठवले यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गटातील संभाव्य घडामोडींवर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून, ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आणखी तीव्र झाली आहे. मात्र, ठाकरे गटाकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *