Headlines

पुढची पिढी घडवण्यास मंदिर परंपरा टिकवणे गरजेचे:त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ मंदिराला नगरकर मदत करणार- आ. जगताप‎




अनादी काळापासून वारकरी संप्रदाय हिंदू धर्म व भगव्या ध्वजाची परंपरा जपत आहे. पुढच्या पिढ्या सुजाण घडण्यासाठी ही धर्मसंस्कृती आणि मंदिर परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांचे भव्य मंदिर उभे राहत असून, हिंदू संस्कृती व मंदिरे जपलीच पाहिजेत. यासाठी या मंदिराला माझ्यासह सर्व अहिल्यानगरवासीयांच्या वतीने मोठी मदत केली जाईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. मार्केटयार्ड येथे मुक्कामास असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळ्यात ते बोलत होते. रविवारी दुपारी झालेल्या या कीर्तनात आ. जगताप रमले होते. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा वारकरी फेटा बांधून आणि संत निवृत्तीनाथांची प्रतिमा देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात आ. जगताप यांच्या हस्ते दिंडीतील मानकरी, विणेकरी व झेंडेकरी यांना फेटे देण्यात आले, तर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकऱ्यांना साड्यांचे वाटप करण्यात आले. कीर्तन सेवेदरम्यान ट्रस्टचे विश्वस्त व मंदिराचे पुजारी जयंत गोसावी महाराज यांचे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर सुश्राव्य कीर्तन झाले. या भावनिक कीर्तनातून त्यांनी समाधी सोहळ्याचे केलेले हुबेहूब वर्णन ऐकून उपस्थित हजारो भाविक भावूक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. सर्व भाविकांनी यावेळी टाळ्यांच्या गजरात पुष्पवृष्टी करत हा समाधी सोहळा अत्यंत भक्तीभावाने साजरा केला. या भक्तीमय सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राहुल साळुंके, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी प्रमुख माधव राठी महाराज, तसेच मार्केटयार्ड येथे दिंडीची चोख व्यवस्था करणारे हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, मर्चंट बँकेचे चेअरमन संजय चोपडा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *