Headlines

मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकात हाय व्होल्टेज ड्रामा:नोकरी गेल्याच्या रागातून डॉक्टर टॉवरवर चढला, गळफासही घेतला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने वाचला जीव




सायन रेल्वे स्थानकात गुरुवारी (२७ ऑगस्ट) सकाळी एका डॉक्टरने टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून संबंधित डॉक्टरने रेल्वे स्थानकातील उच्चदाब वीज टॉवरवर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केल्याने त्याचा जीव वाचला. ही घटना सकाळी साधारण पावणे आठ ते आठ वाजण्याच्या सुमारास घडली. डॉक्टर टॉवरवर चढल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित व्यक्तीची समजूत काढून त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याने पोलिसांचे म्हणणे न ऐकता टॉवरवरच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. टॉवरवर डॉक्टर चढल्याने स्थानकात खळबळ सकाळच्या वेळेत सायन रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. त्याचवेळी एक व्यक्ती टॉवरवर चढल्याचे दिसून आल्यानंतर स्थानक परिसरात मोठी गर्दी झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. पोलिसांकडून संबंधित व्यक्तीशी संवाद साधत त्याला खाली येण्याची विनंती करण्यात आली. त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्याने टॉवरवर गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. पोलिस आणि अग्निशमन दलाची तत्परता डॉक्टरने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न करता बचावकार्य सुरू केले. अत्यंत काळजीपूर्वक टॉवरवर चढून त्यांनी संबंधित व्यक्तीला खाली उतरवले. तोपर्यंत त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याचा श्वास थांबल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. जवानांनी तातडीने त्याला सीपीआर देण्यास सुरुवात केली. वेळेत केलेल्या या प्रयत्नांमुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आले. यानंतर संबंधित डॉक्टरला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती आणि या घटनेमागील नेमकी परिस्थिती याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. नोकरी गेल्याने टोकाचे पाऊल? प्राथमिक माहितीनुसार, टॉवरवर चढलेली व्यक्ती सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रहिवासी असून तो व्यवसायाने डॉक्टर आहे. संबंधित संस्थेत वैद्यकीय प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याच्या कारणावरून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नोकरीवरून काढून टाकल्याने तो नाराज होता. आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत त्याला पुन्हा सेवेत घ्यावे आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी त्याची मागणी असल्याची प्राथमिक माहिती आहे. याच मागणीसाठी त्याने सायन स्थानकातील टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे सायन रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणामागील संपूर्ण घटनाक्रम आणि संबंधित डॉक्टरच्या तक्रारीबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. हेही वाचा… सायबर सेलने कॉमेडियनला घरातून उचललं, पण सन्मान पहिल्यांदाच झाला:समय रैनाची मुख्यमंत्र्यांसमोर मिश्किल प्रतिक्रिया, बिस्किटाच्या प्रश्नानेही पिकला हशा कॉमेडियन समय रैना आणि महाराष्ट्र सायबरचा संबंध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण सायबर कारवाई नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेला एक मिश्कील प्रसंग आहे. महाराष्ट्र सायबरच्या ‘ऑपरेशन 1930’ या जनजागृती उपक्रमाच्या कार्यक्रमात समय रैनाचा सत्कार करण्यात आला. यावेळी समयने आपल्या जुन्या घटनाक्रमाचा मिश्कील संदर्भ देत महाराष्ट्र सायबरच्या कामाचे कौतुक केले आणि अशी टोलेबाजी केली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरता आले नाही. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *