Headlines

हरणबारीची सुरक्षा वाऱ्यावर:शेतकरी 30 वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत; मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन, प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा




हरणबारी धरणाच्या सुरक्षेसह शेतकऱ्यांच्या प्रलंबित मोबदल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणाच्या मुख्य प्रवेशद्वाराला गेट नसणे, सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षकांचा अभाव, तसेच धरणाच्या भिंतीवर आणि सांडव्यावर दुचाकीवरून स्टंटबाजी होत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. उजव्या कालव्यासाठी जमीन देऊन ३० वर्षे उलटूनही बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याचा मुद्दाही पक्षाने उपस्थित केला आहे. या मागण्यांसाठी २८ एप्रिल रोजी निवेदन देऊनही सहा महिन्यांत प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याचा आरोप करत, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक प्रीतेश बागुल यांनी पाटबंधारे विभागाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेट नसल्याने परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. धरणाच्या संवेदनशील भिंतीवर आणि सांडव्यावर काही तरुण दुचाकी घेऊन स्टंटबाजी करत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करतानाच धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित मोबदल्याकडेही प्रहार जनशक्ती पक्षाने लक्ष वेधले आहे. उजव्या कालव्यासाठी जमिनी देऊन ३० वर्षे उलटली, तरी बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *