![]()
पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आम आदमी पक्षाने पुणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. पावसाळा संपत आल्यावर खड्डे बुजविण्याच्या कामांसाठी महापालिका प्रशासनाला जाग आल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. निविदा प्रक्रिया न राबविता थेट सुमारे 16 कोटी रुपयांची कामे देण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा दावा ‘आप’चे महाराष्ट्र प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे. किर्दत यांच्या मते, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती व देखभालीची कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन करते. मात्र, प्रत्यक्षात पावसाळा संपत आल्यावरच खड्डे बुजविण्याची आठवण प्रशासनाला होते. या दिरंगाईमुळे पुणेकरांना पाणी तुंबणे, रस्त्यांवरील खड्डे, अपघात आणि वाहतूक कोंडी अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. त्यानंतर नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतरच खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली जाते. अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती कायम असून, महापालिका प्रशासनाचा कारभार म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी अवस्था झाल्याची टीका किर्दत यांनी केली. निविदा प्रक्रिया वेळेत न राबविण्यामागे ठराविक ठेकेदारांना कामे देण्याचा हेतू असल्याचा आरोप किर्दत यांनी केला आहे. काही नगरसेवकांकडून ठराविक ठेकेदारांना कामे देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा असल्याचे त्यांनी नमूद केले. नगरसेवकांकडून 20 टक्के कमिशनची मागणी होत असल्याची चर्चा असल्याचा दावाही त्यांनी केला, मात्र या आरोपांसंदर्भात त्यांनी कोणतेही ठोस पुरावे सार्वजनिक केलेले नाहीत. सत्ताधारी भाजप, विविध पक्षांतील नगरसेवक, महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात कथित हातमिळवणी करून विनानिविदा कामे देण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप किर्दत यांनी केला. पुणेकरांच्या हालअपेष्टांना सत्ताधारी आणि निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली. पुण्यातील खड्डे हे केवळ रस्त्यांचे खड्डे राहिले नसून, ते भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहेत, अशी घणाघाती टीका किर्दत यांनी केली. महापालिकेतील या कारभारावर राज्य सरकारचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपेक्षित वचक नसल्याचेही या प्रकरणातून दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, ‘आप’ने केलेल्या आरोपांवर महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. प्रशासनाची बाजू मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
Source link
पुण्यातील खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे बनलेत:पावसाळा संपल्यावर पालिकेला खड्ड्यांची आठवण, विनानिविदा 16 कोटींची कामे दिली, आपचा आरोप