![]()
औढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका मजूराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी ता. 27 सकाळी उघडकीला आला आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी आर्थिक विवंचनेतून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा बाजार येथील साधूनगर भागातील राहिवासी असलेले संतोष जनार्धन फुटाणे (40) हे गावातील एका कापड दुकानावर कामाला होते. या शिवाय मागील काही दिवसांपासून त्यांनी पत्राच्या पेट्या तयार करण्याचे काम देखील सुरु केले होते. कापड दुकानावरून मिळणारे पैसे तसेच पेट्या विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नातून त्यांच्या कुटुंबाचा उदनिर्वाह चालत होता. दरम्यान, नेहमी प्रमाणे संतोष हे बुधवारी ता. 26 घरी आले होते. त्यानंतर जेवन करून सर्व कुटुंब झोपी गेले. गुरुवारी पहाटे चार वाजता ते झोपेतून उठून घराबाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतलेच नाही. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व विद्यार्थी शाळेत आले असतांना त्यांना एक मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळता औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, जमादार इम्रान सिद्दीकी, दिलीप पोले, आंबादास बेले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता सदर मृतदेह संतोष फुटाणे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पोलिसांनी मयत संतोष यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळाबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला असून त्या ठिकाणी उत्तरीय तपासणी करण्यात आली. मयत संतोष यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मात्र आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मयत संतोष यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Source link
जवळा बाजारमध्ये मजुराची जिल्हा परिषद शाळा परिसरात गळफास घेऊन आत्महत्या:कारण अस्पष्ट, औंढा नागनाथ पोलिस घटनास्थळी