![]()
शहरात कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महावितरणविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत ठोस उपाययोजना न केल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, सुरेश बनसोडे, प्रकाश भागानगरे, प्राध्यापक माणिक विधाते, संभाजी पवार, जॉय लोखंडे, साधना बोरुडे, रोहिणी अंकुश, सागर गुंजाळ आदी उपस्थित होते. उन्हाळ्याची तीव्रता वाढली असताना, शहरात दिवस-रात्र सतत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. तसेच नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढला आहे. व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान होत असून शहराचा पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे. याबाबत बारस्कर यांनी संताप व्यक्त केला. बारस्कर म्हणाले, महावितरणचे अधिकारी वातानुकुलीत कार्यालयात बसून स्वतःची काळजी घेत आहेत, मात्र त्यांचे जनतेच्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष आहे. नागरिकांनी वीजबिल भरण्यास विलंब केला, तर महावितरणचे कर्मचारी तत्काळ वीज कनेक्शन कट करतात. मात्र, वारंवार होणारी ट्रिपिंग आणि गेलेली लाईट पुन्हा सुरू करण्यासाठी या विभागाकडे वेळ नसतो, त्यामुळे हा सर्व प्रकार जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पावसाळ्यापूर्वी महावितरण विभागाने आवश्यक त्या सर्व तांत्रिक उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात आणि नागरिकांच्या वीजपुरवठ्याबाबतच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी स्वतंत्र टोल फ्री नंबर जाहीर करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Source link
वीजकपातीविरोधात, राष्ट्रवादी आक्रमक; अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा