Headlines

कंटेनरमधून जनावरांची अवैध वाहतूक:50 म्हशी अन्‌ रेड्यांची सुटका, गुदमरून 2 जनावरांचा मृत्यू; वैजापूर-नाशिक महामार्गावर कारवाई




वैजापूर-नाशिक महामार्गावर रविवारी गोवंश आणि जनावरांची अत्यंत क्रूरपणे अवैध वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरचा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून पकडला. या कारवाईत कंटेनरमधून ५० म्हशी व रेड्यांची सुटका करून त्यांना जीवनदान देण्यात आले असून, वाहनासह २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, कंटेनरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरे कोंबल्यामुळे गुदमरून दोन रेड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी वैजापूर-नाशिक महामार्गावरून एक संशयास्पद कंटेनर (एमएच ०४ एचडी ९६५८) वेगाने जात होता. या कंटेनरमधून जनावरांचा मोठ्याने हंबरण्याचा आवाज येत असल्याचे स्थानिक गोरक्षक अजय साळुंके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ कंटेनर थांबवण्याचा इशारा केला; परंतु चालकाने गाडी न थांबवता महामार्गावरून वाहन आणखी वेगाने पळवण्यास सुरुवात केली. गोरक्षकांनी वेळ न दवडता तातडीने ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून वैजापूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांची नाकेबंदी; फिल्मी स्टाईलने आवळल्या मुसक्या माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन नलावडे, योगेश झाल्टे, विशाल पाडळकर, अजय नाचण आणि मेटे यांच्या पथकाने महामार्गावर तात्काळ रणनीतिक नाकेबंदी केली. वेगात येणाऱ्या कंटेनरला घेराव घालत पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्याला थांबवण्यात यश मिळवले. कानपूरच्या चालकाला बेड्या पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता, आतील दृश्य पाहून अधिकारीही हादरले. कंटेनरमध्ये कोणतीही हवा खेळती राहील अशी व्यवस्था नसताना, अत्यंत क्रूरपणे आणि क्षमतेपेक्षा जास्त जनावरे एकमेकांवर कोंबलेली होती. श्वास घेता न आल्याने आणि गुदमरल्यामुळे दोन रेड्यांचा आतच मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाला बेड्या ठोकल्या असून, महम्मद सैफ अफजल सैफ (वय ३०, रा. कानपूर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जनावरांना गोशाळेत केले दाखल पोलिसांनी तातडीने कारवाई करत कंटेनरमधील इतर ५० म्हशी आणि रेड्यांची सुखरूप सुटका केली. या सर्व जनावरांना पुढील सुरक्षितता आणि वैद्यकीय संगोपनासाठी हडसपिंपळगाव येथील ‘श्री रेणुका माता गोशाळेत’ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *