![]()
न्यायालयीन कोठडीत रवानगी होऊन नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात जाण्याची शक्यता असताना पोलीस कोठडीतील महिला आरोपीने पायाला साप चावल्याचा बनाव केल्याचा प्रकार सोमवारी ( २४ ऑगस्ट) नेवासा येथे उघडकीस आला. अहिल्या दत्तात्रेय मैराळ (वय ३८, रा. गंगापूर) हिने सकाळी लॉकअपमध्ये आरडाओरड करत सर्पदंश झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीत सर्पदंश झाल्याचे आढळून आले नाही. त्यानंतर लॉकअपमधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांचा संशय अधिक बळावला. अहिल्या मैराळ हिला बालविवाहाच्या प्रकरणात १८ ऑगस्ट रोजी अटक केली होती. तिच्याविरुद्ध पॉक्सो, सावत्र मुलीला लग्नासाठी विकणे, बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल आहेत. सोमवारी सकाळी सुमारे आठ वाजता तिने पायाला साप चावल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला नेवासेफाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील तपासणीसाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तपासणीत सर्पदंशाचे कोणतेही लक्षण आढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नेवासे पोलिसांनी लॉकअपमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात अहिल्या मैराळ दोन वेळा स्वतःच्या पायाला पिनने टोचत असल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे कारागृहात जाणे टाळण्यासाठी सर्पदंशाचा बनाव केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. वैद्यकीय तपासणीनंतर तिला पुन्हा नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. औषधाने धोका असल्याचे सांगताच कबुली सर्पदंश झालेला नसताना त्यावरील औषध दिल्यास धोका होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर अहिल्या मैराळ हिने साप चावला नसल्याचे कबूल करून जबाब दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
Source link
नाशिक कारागृहाची रवानगी टाळण्यासाठी ‘सर्पदंश’चा डाव:महिला कैदीचा बनाव उघड, पायाला पिन टोचल्याचे पोलिसांचे म्हणणे