Headlines

शेतकऱ्यांना दिलासा:पैठण तालुक्यात पावसाच्या हजेरीमुळे खरीप पेरणीस वेग‎, तालुक्यात सरासरी 26.9 मि.मी. पाऊस




गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने आणि पावसाच्या दीर्घ प्रतीक्षेने कोरड्या पडलेल्या पैठण तालुक्याला अखेर दोन दिवसांच्या समाधानकारक आणि सर्वदूर झालेल्या भिज पावसाने मोठा दिलासा दिला आहे. या दमदार हजेरीमुळे खरीप पेरण्यांच्या कामांना वेग आला आहे. जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी वरुणराजाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत सापडला होता. दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, मंगळवारी व बुधवारी तालुक्यातील बहुतांश महसूल मंडळांमध्ये दमदार पावसाची नोंद झाली. या संततधार भिज पावसामुळे शेतजमिनी पार खोलवर ओलावल्या आहेत. परिणामी, शेतकरी आता सोयाबीन, कापूस, मका आणि बाजरी आदी पिकांच्या पेरणीसाठी शेतात उतरले आहेत. हवामान विभागाने आगामी दोन दिवसांत तालुक्यात आणखी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पेरणीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होईल, असा विश्वास तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी व्यक्त केला आहे. पावसामुळे ग्रामीण भागात ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांच्या साहाय्याने पेरणीची लगबग वाढली असून, बाजारपेठेतील कृषी सेवा केंद्रांवर खरेदीसाठी गर्दी होत आहे. तालुक्यातील मंडळनिहाय पर्जन्यमान (मिलिमीटरमध्ये) बालानगर ६३ मिमी, आडुळ ४३, पाचोड, ३५, ढोरकीन ३३, पैठण २१, लोहगाव २१, नांदर २०, विहामांडवा १५, पिंपळवाडी १०, बिडकीन ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण पाऊस २६९ मिमी असून, दैनिक सरासरी २६.९ मिमी तर आजवरची सरासरी २७.४ मिमी आहे. कृषी सेवा केंद्रांवर खते, बियाणे खरेदीसाठी गर्दी पैठण तालुक्यातील पावसामुळे ग्रामीण भागात ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांच्या साहाय्याने पेरणीची लगबग वाढली असून, बाजारपेठेतील कृषी सेवा केंद्रांवर बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळत असल्याचे चित्र आहे. आकडेवारीनुसार, बुधवारी तालुक्यात एकूण २६९ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्याची दैनिक सरासरी २६.९ मिमी इतकी आहे. पैठणसह बिडकीन, ढोरकीन येथे बियाणे खरेदीस प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *