![]()
पुणे येथे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यांनी ३१ जुलैपूर्वी लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीजबिल माफी दिली जाईल असे सांगितले. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवरही स्पष्टीकरण दिले. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ४५ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या निधीतून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीजबिल माफी दिली जाईल. कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले की, पुढील मंत्रिमंडळ बैठकीनंतर ३१ जुलैपूर्वी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. आयकर न भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे बाकी असल्याने प्रक्रियेला थोडा विलंब होऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहण्याबाबत भरणे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. या भेटीबद्दल कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. कोणीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकते.” सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या मुख्यमंत्री भेटीवरही त्यांनी भाष्य केले. “आम्ही महायुतीतील घटक पक्ष असल्याने कोणीही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकते. यासाठी पक्ष नेतृत्वाला पूर्वकल्पना देण्याची आवश्यकता नाही. आमचा पक्ष मजबूत आहे आणि या भेटींचा कोणताही वेगळा राजकीय अर्थ काढू नये,” असे त्यांनी नमूद केले. नाबार्डच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भरणे उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. नाबार्डच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारचा मोठा निधी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो, असे त्यांनी सांगितले. आमदार अमोल मिटकरी यांच्या कॉलबाबत विचारले असता, कृषी मंत्र्यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले. ते म्हणाले, “विधानसभेच्या कामकाजादरम्यान त्यांचे कॉल आले असावेत. मी नेहमी सर्वांचे फोन उचलतो. मुख्यमंत्र्यांनंतर सर्वाधिक फोन येणारा मी राज्यातील दुसरा मंत्री आहे. अमोल मिटकरी हे मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी अधिक काही बोलणार नाही.” हेही वाचा .. फडणवीस केंद्रात गेल्यास सुनेत्रा पवारांनी राज्याचे नेतृत्व करावे- दत्तात्रय भरणे:म्हणाले- सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी मजबूत महाराष्ट्रातील कर्तबगार नेतृत्वाने देशाचे पंतप्रधान व्हावे, ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. मागील काळात यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांना या पदाने हुलकावणी दिली. मात्र, सध्याच्या घडीला राज्यात देवेंद्र फडणवीस हेच एकमेव नेते आहेत, जे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. त्यांनी आत्ताच पंतप्रधान व्हावे असे आमचे म्हणणे नाही, पण भविष्यात महाराष्ट्राला ही संधी मिळावी यासाठी मी पंढरपूरच्या विठुरायाला साकडे घातले आहे, असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. सविस्तर वाचा
Source link
शेतकऱ्यांना 31 जुलैपूर्वी कर्ज, वीजबिल माफी:45 हजार कोटींचा निधी खर्च होणार; कृषीमंत्र्यांचे राजकीय चर्चांवर स्पष्टीकरण