Headlines

सक्षम ताटे हत्या प्रकरण:आंचलने तीन महिन्यात सासरचे घर का सोडले? सक्षमच्या लहान भावाचे नाव घेत धक्कादायक केला खुलासा




प्रेमासाठी कुटुंबियांविरुद्ध बंड पुकारत, प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न करून त्याच्याच घरी राहण्याचा निर्णय घेणाऱ्या नांदेडमधील आंचल मामिडवार हिच्या प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. “आंचल बहाणा करून घर सोडून निघून गेली,” या सासूच्या आरोपांनंतर आंचलने स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येत मौन सोडले आहे. “प्रियकर सक्षम ताटे याच्या लहान भावाने माझ्याशी अत्यंत गैरवर्तन केले; ही बाब घरात सांगूनही विश्वास न ठेवल्याने मी पोलिसांच्या संरक्षणात घर सोडले,” असा खळबळजनक आरोप आंचलने केला आहे. ६ महिन्यांपूर्वी सक्षम ताटे याची आंचलच्या कुटुंबियांनी गोळ्या घालून आणि डोक्यात फरशी मारून निर्घृण हत्या केली होती. या हत्येनंतर आंचलने सर्वांसमोर सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केले होते आणि ती सासू संगीता ताटे यांच्यासोबतच राहत होती. मात्र, नुकतेच आंचल तीन महिन्यात घर सोडून गेल्याचे सक्षमची आई संगीता ताटे यांनी एका मुलाखतीत सांगितले. त्या म्हणाल्या होत्या, “सक्षमच्या जाण्यानंतर आंचल म्हणाली होती की, मीच आता तुमचा मुलगा आहे आणि तुमची काळजी घेईन. ती ३ महिने सोबत राहिली. पण एक दिवस आजीची तब्येत खराब असल्याचे सांगून ती माहेरी गेली. मी स्वतः तिला सोडून आले, पण त्यानंतर ती कधीच परत आली नाही. आता धाकटा मुलगा नाशिकला शिकत असल्याने मी घरात एकटीच राहिले आहे.” सक्षमच्या लहान भावाचे नाव घेत आंचलचा धक्कादायक खुलासा सासूने केलेल्या या दाव्यांनंतर सोशल मीडियावर आंचलवर प्रचंड टीका आणि ट्रोलिंग सुरू झाले होते. यावर अत्यंत संतप्त होत आंचलने ताटे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. आंचल म्हणाली, “मी आजीचे कारण काढून पळून आलेली नाही. सक्षमचा लहान भाऊ माझ्याशी सतत गैरवर्तन करत होता. हा अत्यंत गंभीर प्रकार मी सक्षमच्या कुटुंबाला (सासूला) सांगितला, मात्र त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही.” आंचल म्हणाली, “जर सक्षमच्या कुटुंबियांचा माझ्यावर विश्वास नसेल, तर उद्या घरात काही चुकीचे किंवा अघटित घडले तर त्याला जबाबदार कोण? म्हणूनच मी कोणाचीही फसवणूक न करता, पोलिसांना पूर्ण कल्पना देऊन घर सोडले. पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः सोबत येऊन मला माझ्या वडिलांच्या घरी सोडले आहे आणि सध्या मी तिथेच सुरक्षित आहे.” याच प्रवासात सक्षमच्या वडिलांचा मृत्यू हा आजारपणामुळे झाल्याचेही आंचलने स्पष्ट केले ट्रोलर्सना आंचलचे आवाहन आंचलने सक्षमचे घर सोडल्याच्या बातम्या पसरल्यानंतर समाजमाध्यमांवर तिच्याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. यावर आंचलने तीव्र नाराजी व्यक्त केली. “सत्य परिस्थिती आणि माझ्यावर ओढवलेला प्रसंग नेमका काय होता, हे जाणून घेतल्याशिवाय कोणीही माझ्यावर खोटे आरोप करू नयेत किंवा मला ट्रोल करू नये,” असे आवाहन तिने केले. नेमके काय होते हे संपूर्ण प्रकरण? नांदेडच्या जुना गंज भागातील आंचल मामिडवार हिचे सक्षम ताटे याच्याशी प्रेमसंबंध होते. आंचलच्या घरच्यांचा याला विरोध होता. ६ महिन्यांपूर्वी इतवारा परिसरात सक्षमला चहा पिण्याच्या बहाण्याने बोलावून आंचलचे वडील, भाऊ आणि मित्रांनी त्याची हत्या केली. सक्षमच्या हत्येनंतर आंचलने घरच्यांविरोधात जात पोलिसात साक्ष दिली आणि वडिलांना व भावाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. एवढेच नाही तर, तिने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करून त्याच्या नावाचे कुंकू लावले होते. तसेच आपण आता सक्षमच्या घरी राहणार असल्याचे तिने म्हटले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *