Headlines

सातारा क्राइम डायरी:वाईत पैशांच्या वादातून चाकूहल्ला; पती गंभीर जखमी, एकावर गुन्हा




वाई पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी सायंकाळी पैशांच्या वादातून झालेल्या चाकूहल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून महिलांनाही दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रशांत भगवान राजपुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे गजेंद्र अपार्टमेंट, भीमकुंड आळी, रविवार पेठ, वाई येथे दि.१८ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी अनिता श्रीनिवास शेलार (वय ४२, रा. रविवार पेठ, वाई) यांच्या घरी त्यांची बहीण रुपाली भगवान राजपुरे आंब्याचे लोणचे करण्यासाठी आली होती. त्यावेळी रुपाली यांचा मुलगा प्रशांत भगवान राजपुरे (वय २५, रा. कणूर, ता. वाई) याने फोनवरून आईकडे गाडी खरेदीसाठी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास कामाच्या ठिकाणी येऊन चाकूने मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीने त्याला आईशी अशा भाषेत बोलू नये, असे सांगितल्याने आरोपी संतप्त झाला. सुमारे अर्ध्या तासाने तो थेट फिर्यादीच्या घरी आला. “आमच्या दोघांमध्ये बोलणारी तू कोण?” असे म्हणत त्याने फिर्यादीवर धाव घेत मारहाण केली.यावेळी पती श्रीनिवास वामन शेलार हे सोडविण्यासाठी मध्ये आले असता आरोपीने त्यांनाही मारहाण केली व सोबत आणलेला चाकू काढून त्यांच्या पोटावर व पाठीवर वार केले. या हल्ल्यात श्रीनिवास शेलार गंभीर जखमी झाले. तसेच फिर्यादी व त्यांच्या बहिणीच्या हातावरही चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी फिर्यादी अनिता शेलार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रशांत राजपुरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाळुंज करत आहेत. वधू-वर प्रवेश सोहळ्यात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख असा १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीत वधू-वर प्रवेश कार्यक्रम सुरू असताना अज्ञात चोरट्याने घरातील कपाट फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद दूध डेअरीजवळ, वनदेव शेरी, पोस्ट धुळदेव, ता. फलटण येथे १० मे रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास ही चोरी झाली. घरात मुलाचा वधू-वर प्रवेश कार्यक्रम सुरू असल्याने घरातील सदस्य सोहळ्यात व्यस्त होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कपाटातील दागिने व रोख रक्कम लंपास केली. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये ४० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे मनीमंगळसूत्र,३० हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे डायमंड जडित मनीमंगळसूत्र, २० हजारांचे एक तोळे वजनाची डायमंड जडित सोन्याची चैन आणि ४५ हजार रोख रक्कम असा एकूण १ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणी फिर्यादी महादेव तात्याबा जाधव (वय ६०, रा. राजाळे, ता. फलटण) यांनी तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार रणवरे करत आहेत. सातार्‍यात होमगार्डवर हल्ला; चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा सातारा शहर पोलीस स्टेशन हद्दीत होमगार्ड जवानावर चार अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, होमगार्ड ओमकार नंदकुमार शिंदे (वय २५, रा. अमरलक्ष्मी, ता. जि. सातारा) हे १८ मे रोजी ड्युटी संपवून रात्री ८ वाजता महाबळेश्वरहून सातार्‍यात आले. ते घरी जात असताना रात्री सुमारे ९.३० वाजता शिवराज पेट्रोल पंपापासून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढ्याजवळ चार अनोळखी इसमांनी त्यांच्या दुचाकीसमोर स्वतःची गाडी आडवी घातली. कोणतेही कारण नसताना संबंधितांनी बोथट तलवारीने शिंदे यांच्यावर वार केले. तलवारीला धार नसल्याने डाव्या हाताला मुक्कामार लागला, तर डाव्या मांडीवर दुसरा वार झाल्याने मांडीला खरचटून रक्तस्राव झाला.हल्लेखोर त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी होमगार्ड ओमकार शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञात इसमांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पाटोळे करत आहेत. लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणीवर सत्तूर हल्ला; आरोपीवर गुन्हा लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. अमोल जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी एमआयडीसी, ‘कूपर कंपनी ट्रॅक्टर प्लांट’ समोरील रस्त्यावर १७ मे रोजी सकाळी सुमारे ११ वाजता ही घटना घडली.यावेळी फिर्यादी मानसी प्रकाश देशमुख (वय २७, रा. करंडी, ता. जि. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमोल जाधव (रा. करंडी, ता. जि. सातारा) याने लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून मटण शॉपमधील सत्तूर आणला. आरोपीने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बोटावर सत्तूरने वार करून तिला जखमी केले. त्यानंतर त्याने त्याच सत्तूरने स्वतःच्या डाव्या हातावरही वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी अमोल जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार देखने करत आहेत. गोडोलीतील जोशी वाड्यात मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा सातारा शहर पोलीस स्टेशन हद्दीत पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना गोडोली येथील जोशी वाड्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी जोशीवाडा, गोडोली येथे सचिन हनुमंत मोरे (वय ३५, रा. १५६ जोशी वाडा, गोडोली, सातारा) हे त्यांच्या मामाच्या घरी असताना ही घटना घडली. तानाजी संभाजी जाधव (वय ४५) यांनी हाताने मारहाण केली, तर त्यांचा मुलगा अनुप तानाजी जाधव (वय २५), दोन्ही रा. १४७ जोशी वाडा, गोडोली, यांनी पट्टी कटरने दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी सचिन मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कणसे करत आहेत. महिलेला मारहाण व विनयभंग; फरशी फोडून मालमत्तेचे नुकसान सातारा तालुका पोलीस स्टेशन हद्दीत ५६ वर्षीय महिलेवर मारहाण करून विनयभंग केल्याचा तसेच मालमत्तेची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१९ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता सातारा तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. फिर्यादी महिलेच्या वडिलोपार्जित घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत शेजारी राहणारा सुदाम भैरू भोसले हा आला व त्याने शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. फिर्यादीने विरोध केल्यावर त्याने तिचे अंगावरील कपडे फाडून अंगाला स्पर्श करत विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे.यावेळी मालन कांबळे, नलिनी कांबळे व रंजना (पूर्ण नाव माहिती नाही) यांनीही हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच सुदाम भोसले याने शेडमध्ये टाकलेली फरशी फोडून सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान केले व “तुला इथेच गाडून टाकतो” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी सुदाम भैरू भोसले, मालन कांबळे, नलिनी कांबळे व रंजना (रा. लिंब, ता. जि. सातारा) यांच्याविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत. मुलगा होत नाही म्हणून दुर्गा पेठेत विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा विवाहित महिलेला मुली होत असून मुलगा होत नसल्याच्या कारणावरून तसेच ५ लाख रुपये आणण्याची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडेपीर कच्छी बिल्डिंग परिसर, पोलीस करमणूक केंद्र, दुर्गा पेठ, सातारा येथे ही घटना घडली आहे. फिर्यादीच्या लग्नानंतर तीन महिन्यांपासून ते १८ मे २०२६ दरम्यान हा छळ सुरू होता. फिर्यादी बीबी आयेशा शादाब मुल्ला (वय २६, रा. दुर्गा पेठ, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,तुला मुलीच होत आहेत,मुलगा होत नाही “तू तुझ्या आई-वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये” अशी मागणी करत मारहाण व मानसिक त्रास दिला जात होता. या प्रकरणी पती शादाब हजरत मुल्ला, दीर सलमान हजरत मुल्ला, नणंद मुस्कान जुबेर शेख, सासू शबाना हजरत मुल्ला व सासरा हजरत हसन मुल्ला (सर्व रा. मुजावर कॉलनी, बाराडबरा, आर. एस. मंगल कार्यालयापुढे, कराड, ता. कराड, जि. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार यादव करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *