Headlines

'कॉकरोच जनता पार्टी':सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा नवा ट्रेंड सुरू करणारा अभिजीत दिपके कोण? वाचा इन्साइड स्टोरी




मागील 3 दिवसांपासून ‘एक्स’ आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ हा एक नवीनच ट्रेंड धुमाकूळ घालत असून, इंटरनेटवर ‘बेरोजगार आणि आळशी लोकांचा आवाज’ असल्याचा दावा करणाऱ्या या उपहासात्मक राजकीय आघाडीने अवघ्या तीन दिवसांत देशभरातील एक लाखांहून अधिक तरुणांना आकर्षित करून इन्स्टाग्रामवर तब्बल 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. या संपूर्ण व्हायरल वादळाच्या केंद्रस्थानी छत्रपती संभाजीनगरचा 30 वर्षीय तरुण अभिजीत दीपक दीपके हा आहे. छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असलेला अभिजीत दीपके हा एक व्यावसायिक राजकीय संवाद रणनीतिकार आहे. पुण्यातून पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या अभिजीतने नुकतेच तेथील प्रतिष्ठित अशा बोस्टन विद्यापीठातून जनसंपर्क या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. राजकीय संदेश व्हायरल करण्याचा व्यापक अनुभव असलेल्या अभिजीत दीपके याने 2020 ते 2022 या काळात ‘आम आदमी पार्टी’च्या सोशल मीडिया टीममध्ये एक प्रमुख स्वयंसेवक म्हणून काम पाहिले आहे. विशेषतः 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘आप’च्या बाजूने आलेल्या मीम्सच्या लाटेमागे त्याचीच कल्पकता असल्याचे मानले जाते. याशिवाय त्याने दिल्ली शिक्षण विभागासाठी संवाद सल्लागार म्हणूनही महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगारांना झुरळ संबोधले होते सर्वोच्च न्यायालयाच्या एका तोंडी टिप्पणीतून या चळवळीची ठिणगी पडली. 15 मे 2026 रोजी बनावट पदव्यांशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी, ‘काही बेरोजगार लोक झुरळांप्रमाणे कायदा, प्रसारमाध्यमे आणि आरटीआयसारख्या प्रणालींमध्ये घुसखोरी करतात,’ असे म्हटले होते. यावर त्यांनी नंतर स्पष्टीकरण देत आपली ही टिप्पणी सामान्य बेरोजगार तरुणांसाठी नसून केवळ बनावट पदव्या बाळगणाऱ्यांसाठी असल्याचे सांगितले, मात्र तोपर्यंत या वक्तव्याचे पडसाद उमटून सोशल मीडियावर संतापाचा मोठा उद्रेक झाला होता. “जर सर्व झुरळे एकत्र आली तर काय होईल?” नीट पेपरफुटी आणि वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये खदखदणारा संताप अचूक हेरून, अभिजीत दीपकेने 16 मे रोजी ‘एक्स’वर गंमतीने “जर सर्व झुरळे एकत्र आली तर काय होईल?” अशी पोस्ट करत ‘कॉकरोच जनता पार्टी’ची वेबसाइट आणि गुगल फॉर्म लाँच केला. ‘द वीक’ने दिलेल्या वृत्तानुसार, या पक्षात सामील होण्यासाठी त्याने ठेवलेले ‘बेरोजगार आणि आळशी असणे, चोवीस तास इंटरनेटवर ऑनलाइन राहणे आणि व्यावसायिक पातळीवर तक्रार करण्याची क्षमता असणे’ हे उपहासात्मक व हटके निकष आजच्या ‘जनरेशन-झी’ तरुणाईला अगदी चपखल लागू पडणारे आणि विशेष भावणारे ठरले आहेत. अनेक राजकीय नेत्यांकडून पाठिंबा टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा आणि कीर्ती आझाद यांसारख्या प्रमुख नेत्यांनीही सोशल मीडियावर या उपहासात्मक मोहिमेला आपला पाठिंबा दर्शवला असून, एका पत्रकारिता पोर्टलने नमूद केल्याप्रमाणे, केवळ एका विनोदातून सुरू झालेल्या या चळवळीने आता पेपरफुटी, बेरोजगारी आणि तरुणांमधील वाढता मानसिक तणाव यांसारख्या अत्यंत गंभीर व महत्त्वाच्या प्रश्नांवर एका व्यापक राजकीय चर्चेचे रूप धारण केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *