Headlines

'स्कूल ठीक करो' मोहिमेचा दणका:हिंगोलीत दारुडा मुख्याध्यापक निलंबित; पण 4 नव्या शिक्षकांसाठी अभिजीत दिपकेंचे आंदोलन सुरू




कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाचा मोठा दणका हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. भरदिवसा शाळेत दारू पिऊन झोपणाऱ्या लिंबाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला अखेर निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अभिजीत दिपके यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ते हिंगोलीत पोहोचण्यापूर्वीच प्रशासनाने ही कारवाई केली. मात्र, कारवाई होऊनही शाळेला 4 नवे शिक्षक मिळावेत, या मागणीसाठी दिपके यांनी शाळेतच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. नेमके काय होते प्रकरण? हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा गावातील जिल्हा परिषद शाळेत विनोद कटके नावाचा मुख्याध्यापक भरदिवसा दारू पिऊन येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. अभिजीत दिपके यांनी या शाळेला भेट दिली असता, हा मुख्याध्यापक चक्क दारूची बाटली घेऊन शाळेच्या आवारात फिरताना आणि वर्गात लहान मुलांसमोरच दारूच्या नशेत झोपलेला असल्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आला होता. या गंभीर प्रकारानंतर दिपके यांनी प्रशासनाला धारेवर धरत, संबंधित शिक्षकावर तत्काळ कारवाई न झाल्यास मंगळवारी उपोषण आणि आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला होता. दिपके हिंगोलीत पोहोचण्यापूर्वीच कारवाईचे आदेश अभिजीत दिपके यांच्या इशाऱ्यानंतर हिंगोली शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. दिपके आज हिंगोलीत दाखल होण्यापूर्वीच, हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विवेक गायकवाड यांनी संबंधित मुख्याध्यापक विनोद कटके याच्या निलंबनाचे आदेश काढले. मुख्याध्यापक निलंबित, तरीही अभिजीत दिपके आंदोलनाला का बसले? दारुड्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई झाली असली, तरी लिंबाळा गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी अभिजीत दिपके यांनी नवी मागणी लावून धरली आहे. केवळ एका शिक्षकावर कारवाई करून भागणार नाही, तर या शाळेला तातडीने चार नवे आणि चांगले शिक्षक द्यावेत, या मागणीवर दिपके ठाम आहेत. जोपर्यंत शाळेला नवे शिक्षक मिळत नाहीत, तोपर्यंत आपण शाळेतून जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेत त्यांनी तिथेच आंदोलन सुरू केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन या आंदोलनादरम्यान दिपके यांचे शिक्षणाधिकाऱ्यांशी फोनवरून बोलणे झाले असून, शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘लेटरहेड’वर नव्या शिक्षकांच्या नियुक्तीबाबत लेखी आश्वासन देण्याचे कबूल केले आहे. सध्या अभिजीत दिपके लिंबाळा गावातील शाळेची सविस्तर पाहणी करत असून, जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी स्वरूपात ठोस निर्णय येत नाही, तोपर्यंत त्यांचा हा शैक्षणिक लढा तिथेच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रश्‍नावर गावकऱ्यांनी मंगळवारी ता. 18 सुरू केलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला. यावेळी बोलतांना दिपके म्हणाले की, राज्यात शाळांमधून गंभीर समस्या आहेत. ‘स्कुल ठिक करो’ अभियानांतून अनेक बाबी उघड झाल्या आहेत. कुठे विद्यार्थ्याना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही, बेंच नाही, पिण्यासाठी पाणी नाही, शआळेत शिक्षकांची संख्या कमी आहे, स्वच्छतागृह नाहीत या परिस्थितीत विद्यार्थी शिक्षण घेणार तरी कसे असा सवाल त्यांनी केला. अधिकाऱ्यांची मुले खाजगी शाळांमधून शिक्षण घेतात तर गोरगरीबांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. या शाळांमधील सुविधांकडे लक्ष देण्याचे अधिकाऱ्यांचे काम नाही का असा सवाल त्यांनी केला. अधिकाऱ्यांनी त्यांची मुले जिल्हा परिषद शाळांमधेच प्रवेशीत केली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे आपण विश्‍वगुरुच्या गप्पा मारत आहोत अन दुसरीकडे स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी देता येत नसेल तर यापेक्षा मोठे दुर्देव काय आहे. उगीच बाहेर देशात जाऊन मोठ्या गप्पा मारणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सोयी सुविधा उपलब्ध झाल्याच पाहिजेत. जाहिरात बाजी व इतर कार्यक्रमांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्या ऐवजी हा खर्च शाळांच्या दुरुस्तीवर केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यातील बहुतांश शाळांमधून शिक्षकांची अपुरी संख्या आहे. त्यामुळे आता तातडीने शिक्षकांची भरती केल्यास शाळांमध्ये पुरेसे शिक्षक उपलब्ध होऊ शकतील शिवाय बेरोजगारीही कमी होईल. मात्र सरकारी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सत्ताधाऱ्यांना आमचे मते हवी असली तर त्यांनी आधा शाळांमधून सुधारणा कराव्यात अन्यथा आम्ही त्यांना मतदान करणार नाही असा इशारा त्यांनी दिला. हेही वाचा.. हिंजवडी आयटी पार्कमधील 15 लाख नोकऱ्या धोक्यात:आदित्य ठाकरेंचा धक्कादायक दावा, राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची मागणी राज्याच्या विविध शहरांच्या आणि जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी चाकणनंतर नुकतीच पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कची पाहणी केली. या पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधील तब्बल 15 लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने आणि मांडलेल्या आकडेवारीने मोठी खळबळ उडाली असून, राज्य सरकारने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन लोकांच्या नोकऱ्या वाचवल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *