![]()
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे आधारवड आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांचे नुकतेच (१९ जून) दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील समस्त प्राध्यापकांच्या वतीने दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी एकत्र येत भाऊंच्या संघर्षमय प्रवासाला उजाळा दिला. नुटा आणि एमफुक्टो या प्राध्यापक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यभर शिक्षक चळवळीचे नेतृत्व केले. प्राध्यापकांच्या वेतन श्रेणीतील सुधारणा, सेवा संरक्षण, निवृत्तीवेतन, १९९४ च्या विद्यापीठ कायद्यातील सुधारणा आणि शैक्षणिक धोरणांमध्ये प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेला लढा ऐतिहासिक ठरला. संप काळातील पगार मिळवून देण्यातही त्यांचे अथक परिश्रम होते, अशी भावना प्राध्यापकांनी यावेळी व्यक्त केली. चळवळीतील कार्यकर्ता हा सच्चा आणि सात्त्विक असावा, असा त्यांचा कटाक्ष असायचा. त्यांच्या विचारांचा आणि निस्वार्थ नेतृत्वाचा वारसा भविष्यात चालवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना प्राचार्य डॉ. संग्राम मोरे आणि डॉ. सतीश यादव यांनी व्यक्त केली. केवळ शिक्षकांचेच नव्हे, तर शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रश्नही त्यांनी विधानपरिषदेत हिरीरीने मांडले. जलसिंचनाच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी. आर. भूरे यांनी केले. अखेरीस सामूहिक आदरांजली वाहण्यात आली. सैनिकांप्रमाणेच योगदान प्रा. बी. टी. देशमुख यांच्या निधनाची बातमी शिक्षण क्षेत्राला वेदना देणारी आहे. ज्याप्रमाणे सैनिक सीमेवर लढतात आणि आपण देशात शांत झोपू शकतो, अगदी तसेच कार्य भाऊंनी प्राध्यापकांसाठी केले. त्यांच्या संघर्षामुळे आज अनेक प्राध्यापक सुरक्षित जीवन जगत आहेत. त्यांनी निस्वार्थ आणि प्रामाणिक कार्य निष्ठेचा आदर्श घालून दिला. आजचे मतभेद आणि मन भेद विसरून सर्वांनी ‘शिक्षण वाचवा, देश वाचवा’ यासाठी एकत्र येण्याची गरज डॉ. दीपक चाटे व डॉ. जयद्रथ जाधव यांनी व्यक्त केली. संघर्षमय प्रवासाचे ठळक पैलू .नुटा आणि एमफुक्टोच्या माध्यमातून राज्यव्यापी शिक्षक चळवळीचे यशस्वी नेतृत्व. .प्राध्यापकांना सेवा संरक्षण आणि निवृत्तीवेतन मिळवून देण्यात सिंहाचा वाटा. .संप कालावधीतील रखडलेले वेतन मिळवून देण्यासाठी शासनाशी यशस्वी लढा. .सिंचन आणि पाणी प्रश्नांवर विधानपरिषदेत केलेला सखोल अभ्यासपूर्ण पाठपुरावा. चळवळीचे अधिष्ठान शिक्षक चळवळीला केवळ आक्रमकतेचे नव्हे, तर वैचारिक आणि कायदेशीर अभ्यासाचे अधिष्ठान देण्याचे काम प्रा. बी. टी. देशमुख यांनी केले. ‘नुटा बुलेटीन’ हे प्रभावी माध्यम उभारून त्यांनी प्राध्यापकांमध्ये जागृती निर्माण केली. राजकारणातही ते अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांनी कधीही स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी पदाचा वापर केला नाही, तर सातत्याने समाजाचे आणि शिक्षणाचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले, असे प्रतिपादन डॉ. अमोल लाटे आणि विश्वंभर भोसले यांनी केले.
Source link
हक्कांसोबत कर्तव्याची शिकवण देणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड:स्मृती दयानंद कॉलेजमध्ये प्राध्यापक संघटनांकडून प्रा. बी. टी. देशमुखांना आदरांजली