![]()
हिंगोली शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोरील निवासस्थानांच्या जवळ पाच दिवसांचे अर्भक सोमवारी ता. ८ दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास काट्यात फेकलेले आढळून आले. हिंगोली शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अर्भकाला काट्यातून बाहेर काढून शासकिय रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून नवजात अर्भक फेकणाऱ्या मातेचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत.या निवासस्थानांच्या बाजूलाच असलेल्या काट्यांमधून बाळाचा रडण्याचा आवाज येत होते. त्यानंतर काही नागरीकांनी तेथे पाहणी केली असता काट्यांमधे नवजात अर्भक असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, जमादार अशोक धामणे, सुनील अंभोरे, ज्ञानेश्वर मस्के, बालाजी डवरे, गणेश लेकुळे, गणाजी पोटे, गजानन मस्के यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नवजात अर्भकास काट्यातून बाहेर काढले. सदर अर्भक पुरुष जातीचे असून चार ते पाच दिवसांपुर्वी जन्मलेले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अर्भकास तातडीने हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर पोलिसांनी आता मुख्यरस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून सदर अर्भक टाकणाऱ्या मातेचा किंवा व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. धुवाँधार पावसानंतर घडलेला प्रकार हिंगोली शहरात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह धुवाँधार पाऊस झाला. या पावसानंतरच कोणतरी हे अर्भक टाकले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेने अर्भकास जिवदान मिळाले आहे. आता त्याच्या मातेच्या शोधानंतरच नेमका प्रकार उघडकीस येणार आहे.
Source link
हिंगोलीत पाच दिवसांचे नवजात अर्भक काट्यात फेकले:पोलिसांच्या सतर्कतेने अर्भकास जिवदान, शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल