![]()
‘नीट’ परीक्षा घोटाळा ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ कठोर पावले उचलली आहेत. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी उद्या संसदेत नवा कायदा मांडला जाणार असून, त्यात १० वर्षांची सक्तमजुरी आणि १० कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद असणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे आंदोलन हे मूळतः अराजकीय होते; मात्र राहुल गांधी आणि महाराष्ट्रातील पराभूत नेत्यांनी देशात बांगलादेश किंवा श्रीलंकेसारखी अराजकता माजवण्यासाठी या आंदोलनाचा राजकीय वापर केला, असा खळबळजनक आणि गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेल्या धडक निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, “नीट पेपर लीक होणे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेचे गांभीर्य पंतप्रधान मोदी यांनी घेतले आणि तत्काळ नवीन कायदा करण्याचा निर्णय घेतला. याबाबत उद्या संसदेत बिलही येईल. त्यामध्ये १० वर्ष सक्त मजुरी आणि १० कोटी रुपये दंड, केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, अशी तरतूद असणार आहे.” एकनाथ शिंदे म्हणाले, “याशिवाय एनटीएमधील ४२७ लोकांना काढून टाकले. तसेच जे आरोपी आहेत, त्यांना जेरबंद केलेले असून सीबीआय त्यांची चौकशी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: सांगितलेले आहे की, कुणालाही यामधून सुटका नाही. या प्रकरणात सापडणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल.” “विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असल्याने त्यांच्या पंतप्रधान मोदींनी नेहमीच प्राथमिकता दिली आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला आहे,” असेही शिंदे म्हणाले. राहुल गांधींचा पंतप्रधान निवासावर घातपात घडवण्याचा डाव विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवर निशाणा साधताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांचे आंदोलन अराजकीय होते. पण त्यांच्या आंदोलनात काही लोकांनी सहभाग घेत, ते आंदोलन राजकीय केले. काही लोक जंतर-मंतरवर न जाता पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे गेले. पंतप्रधानांचे निवासस्थान हायसेक्युरिटी झोन असतो. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर एसपीजेचा कायदा करण्यात आला. तेव्हापासून पंतप्रधान निवासस्थानाच्या परिसरात कुठलेही आंदोलन करता येत नाही. ही माहिती राहुल गांधी यांना माहीत असताना सुद्धा, तिथे जाणीवपूर्वक आंदोलन करणे, हजारो लोकांना तिथे बोलावणे, याचा अर्थ काय? याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा त्यांची मनशा होती.” राहुल गांधींच्या कृत्याचा निषेध एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधी पक्ष नेहमी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका म्हणतात. अशाप्रकारची अराजकता देशात पसरवणे त्यांचा उद्देश होता. हे निंदनीय आहे. विरोधी पक्ष नेत्याने अशाप्रकारचे कृत्य करता कामा नये. यापूर्वी देखील आपण देशाचे दोन पंतप्रधान गमावलेले आहेत. म्हणून राहुल गांधी यांनी केलेल्या कृत्याचा कठोर शब्दांत निषेध करतो. विरोधी पक्ष नेते असताना देखील राहुल गांधी सर्वांना पंतप्रधान निवासस्थानावर आंदोलन करण्यासाठी आवाहन करत होते. ही गांभीर्याने घेण्याची बाब आहे.” बेगानी शादी में अब्दुल्लाह दिवाना, उद्धव ठाकरेंना टोला महाराष्ट्रातून दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात गेलेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांवर आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना पूर्णपणे नाकारले आणि ठोकारले आहे, ते नेते दिल्लीत जाऊन विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर ‘आग लागलेली आहे, आता ती विझवू देऊ नका’ अशी पेटवापेटवीची भाषा करत होते. देशामध्ये दंगल आणि अराजकता पसरवण्याचा त्यांचा हा कट विद्यार्थ्यांनी समंजसपणा दाखवून आंदोलन मागे घेतल्यामुळे पूर्णपणे भुईसपाट झाला आहे. कट फसल्यामुळे हे नेते आता हताश झाले असून, यांची अवस्था ‘बेगानी शादी में अब्दुल्लाह दिवाना’ अशी झाली आहे.” विद्यार्थ्यांनी आपले व्यासपीठ राजकारण्यांना देऊ नये “आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठिशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आहेत. आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य झाल्या असून, अभ्यास करावा, आपले करिअर घडवावे. आपले व्यासपीठ कुठल्याही राजकीय पक्षाला राजकारण करण्यासाठी देऊ नये,” असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना केले.
Source link
राहुल गांधींना पंतप्रधान निवासावर घातपात घडवायचा होता:महाराष्ट्राने नाकारलेले लोक दिल्लीत जाऊन आगीत तेल ओतत होते – एकनाथ शिंदे