![]()
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्याने तब्बल ४२ महिन्यांचा पगार थकल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याप्रकरणी आता सिंहगड संस्थेच्या संस्थापकांसह विश्वस्तांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पगार न दिल्याने आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावातून संबंधित कर्मचार्याने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सेक्रेटरी सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचना नवले ऊर्फ अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले तसेच इतर विश्वस्त आणि ट्रस्टी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. समीर माधवराव दाभोळकर (वय ५३, रा. हिंगणे खुर्द) यांनी १३ मे रोजी सिंहगड कॅम्पसमधील पन्हाळा हॉस्टेलच्या रूम क्रमांक २३ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांचा मुलगा वृषभ दाभोळकर (वय २२) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, समीर दाभोळकर हे १५ जून २००२ पासून संस्थेत वॉचमन म्हणून कार्यरत होते. मात्र, त्यांना सुमारे ४२ महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते व कर्जबाजारी झाले होते. या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणात संबंधित संस्थेच्या पदाधिकार्यांनी आणि विश्वस्तांनी वेतन न दिल्यानेच आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप मुलाने फिर्यादीत केला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.
Source link
पगार थकल्याने सुरक्षारक्षकाची आत्महत्या:सिंहगड कॉलेज संस्थापक, विश्वस्तांवर गुन्हा दाखल