Headlines

विलास घुले हत्याप्रकरणी बीडमध्ये धडक मोर्चा:"…तर मराठा आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या नोकऱ्यांना चॅलेंज करू", गुणरत्न सदावर्तेंचा इशारा




मित्र उमेश माने याच्या अनैतिक संबंधांतून निर्माण झालेल्या वादातून 21 जून रोजी झालेल्या विलास घुले खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा हात असल्याचा आरोप करत, त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. या हत्या प्रकरणात सध्या 10 आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, या प्रकरणात आता खासदारपुत्रावर कारवाईच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही सहभाग नोंदवला. विलास घुले यांच्या पत्नीला नोकरी दिली पाहिजे. नोकरी नाही दिली तर मराठा आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या नोकऱ्यांना आम्ही चॅलेंज करणार, असा इशारा सदावर्ते यांनी दिला आहे. विलास घुले हत्याप्रकरणी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज बीडमध्ये आयोजित करण्यात आलेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी स्टेजवर आलेले उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यात काही काळ शाब्दिक चकमक उडाली. मात्र, उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अखेर सदावर्ते यांनी त्यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द केले. या मोर्चानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या उपस्थितीत मयत विलास घुले यांच्या कुटुंबीयांनी आपले उपोषण सोडले. प्रशासनाने येत्या आठ दिवसांत या प्रकरणी ठोस कारवाई न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच उपोषण सोडल्यानंतर सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत घुले कुटुंबीयांना नोकरी देण्याची आग्रही मागणी केली. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, मनोज जरांगेच्या माध्यमातून व्हायरस पसरवला जातो आहे. विखे आणि इतर मराठा मंत्र्यांनी समोर येऊन याबाबत सांगावे. महसूल खाते बावनकुळे साहेबांकडे नको म्हणून प्रयत्न सुरू आहे. नॉन मराठा महसुल मंत्री नको म्हणून टेंडर देण्यात आलेले आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा किती रोल आहे माहिती नाही. यापुढे जरांगे बावनकुळ्या म्हणून अपमान केला तर एकनाथ शिंद्या, एकनाथ्या म्हणून अपमान करेल. आमचा मास्टर प्लॅन आठ दिवसांत जाहीर करू. विलास घुले यांच्या पत्नीला नोकरी दिली पाहिजे. नोकरी नाही दिली तर मराठा आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या नोकऱ्यांना आम्ही चॅलेंज करणार.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *