![]()
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरेंना पक्षाच्या कार्यकारिणीतून वगळण्यात आले नसल्याचा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे दोघेही पक्षाचे सक्षम नेते आहेत. त्यामुळे त्यांचे पक्षातील स्थान कधीही कमी होणार नाही, असे ते म्हणालेत. शरद पवारांनी तटकरे व पटेल या दोन्ही नेत्यांचे कोणत्या उद्देशाने कौतुक केले हे समजत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. सुनेत्रा पवार यांनी गत महिन्यात निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे त्यांनी आयोगाला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची माहिती दिली होती. पण त्यात प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांची नावे नव्हती. याविषयी राज्याच्या राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना मंत्री अनिल पाटील यांनी हे दोन्ही नेते सक्षम असून, त्यांचे पक्षातील स्थान कधीही कमी होणार नसल्याची भावना व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी तटकरे व पटेल यांना पक्षाच्या कार्यकारिणीतून वगळण्यात आले नसल्याचा दावाही केला. तटकरे, पटेलांना कार्यकारिणीतून वगळण्यात आले नाही अनिल पाटील म्हणाले, सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्यकारिणीतून वगळण्यात आले नाही. पक्षाच्या वर्किंग कमिटीत पटेल हे दुसऱ्या, तर तटकरे हे तिसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळे त्यांना वगळण्यात आले असे म्हणणे साफ चुकीचे आहे. हे दोन्ही नेते पक्षावर नाराज नाहीत. यासंबंधीच्या चर्चेतही कोणते तथ्य नाही. ते नाराज असते तर ते गुवाहाटी व पश्चिम बंगालमध्ये शपथविधीच्या कार्यक्रमाला गेले नसते. त्यांचा बैठकांतील सहभागही दिसला नसता. पण तरीही थोडेबहुत काही असेल किंवा गैरसमजातून काही घडले असेल तर पक्ष नेतृ्त्व योग्य ती पाऊले उचलेल. पण तटकरे व पटेल हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांचा मानसन्मान कुठेही कमी होणार नाही याची काळजी पक्षाकडून घेतली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले आहे. अनिल पाटील यांनी यावरही भाष्य केले. पण पवारांनी या दोघांचे कौतुक का केले? हे आपल्या आकलनापलीकडील असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ते रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांना बारामतीच्या निवडणुकीलाही येता आले नाही. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही मागील 15 दिवसांपासून प्रयत्नशील होतो. आजारपणात एखाद्याची भेट घेण्यासाठी जायचे असेल तर त्यात राजकारण आणण्याची गरज नाही. शरद पवारांनी केलेल्या कौतुकावरही भाष्य शरद पवारांनी कोणत्या उद्देशाने सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांचे कौतुक केले यावर मी बोलणे योग्य ठरणार नाही. पण तटकरे व पटेल हे दोघेही सक्षम नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही निवडणुका लढल्या. त्यामुळे त्यांचे पक्षातील स्थान कधीही कमी होणार नाही. याची काळजी पवार साहेबच काय सुनेत्रा वहिनीही निश्चितच घेतील. अनिल पाटील यांनी यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, अजितदादा गेल्यानंतरही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू आहे. पण विलिनीकरण करायचे म्हणजे 2 गोष्टी आहेत. एक तर आम्ही सत्तेबाहेर जावे किंवा त्यांनी सत्तेत यावे. पण या प्रकरणी कुणी काय करावे याविषयी शरद पवार गटाकडून कुणीही बोलत नसल्याने स्पष्टता येत नाही. ती यायला पाहिजे. त्यांना सत्तेतच यायचे असेल तर त्यांनी एनडीएला पाठिंबा द्यावा. त्यानंतरच या सगळ्या चर्चांना महत्त्व आहे, अन्यथा या सर्व चर्चाच आहेत. आनंद परांजपे कार्यालयात काम करणारे चांगले नेते होते अनिल पाटील यावेळी आंद परांजपे यांच्या शिवसेना प्रवेशावर भाष्य करताना म्हणाले, आनंद परांजपे हे पूर्वी शिवसेनेत होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीत आले. पण आता त्यांनी एकनाथ शिंदेंशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काही स्थानिक अडचणी असतील हे आम्ही समजू शकतो. पण ते सोडले तर त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत काम करत आहे. ते आमच्या पक्षातून गेल्याचे दुःख आहे. कारण, ते कार्यालयात चांगले काम करणारे नेते व प्रवक्ते होते. पण ठाणे शहरातील काही चांगले कार्यकर्ते पुढील काही दिवसांत राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसतील.
Source link
पटेल, तटकरे हे दोघेही सक्षम नेते:त्यांचे पक्षातील स्थान कधीही कमी होणार नाही – अनिल पाटील; शरद पवारांनी केलेल्या प्रशंसेवरही भाष्य