![]()
मराठी चित्रपट कलाकारांनी 79 व्या कान्स चित्रपट महोत्सवात महाराष्ट्राची मान उंचावली. अभिनेत्री प्राजक्ता माळीने मोरपिशी नऊवारी, नथ आणि पारंपरिक दागिन्यांचा साज करत सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत. या वेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ आणि अंकिता वालावलकर यांनीही मराठमोळ्या अंदाजात एन्ट्री घेत मराठीचा झेंडा फ्रान्समध्ये दिमाखात फडकवला. अशोक सराफ यांनी त्यांचे दोन फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, “मराठी वारशाची शान घेऊन कान्सच्या रेड कार्पेटवर टाकलेले प्रत्येक पाऊल खास होते.’ कान्समधील भारत पॅव्हेलियनला अभिजात मराठी ओटीटीचं ग्लोबल लाँच आयोजित करण्यात आलं होतं. या लाँचला अशोक सराफ, निवेदिता, प्राजक्ता उपस्थित होते. पाहा कान्समधील काही खास PHOTO… अशोक-निवेदिता सराफ यांच्या लूकची चर्चा कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी केलेली एन्ट्री सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील हे लोकप्रिय दाम्पत्य हातात हात घालून रेड कार्पेटवर आले आणि उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. या दोघांनीही पारंपरिक मराठी पेहरावाला प्राधान्य दिल्याने त्यांचा लूक अधिक उठून दिसला. ग्लॅमर आणि फॅशनच्या झगमगाटातही आपल्या संस्कृतीशी जोडलेले राहण्याचा संदेश त्यांनी दिल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली. अशोक सराफ यांनी कान्ससाठी साधा पण आकर्षक असा पोशाख निवडला होता. पांढऱ्या रंगाचा सूट आणि काळ्या रंगाची पँट अशा लूकमध्ये ते दिसले. तर निवेदिता सराफ यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक वैभवाची ओळख असलेली पैठणी साडी परिधान केली होती. त्यासोबतच त्यांनी दागिने, गजरा आणि पारंपरिक साजशृंगार करून आपला लूक पूर्ण केला होता. रेड कार्पेटवर त्यांचा हा मराठमोळा अंदाज पाहून उपस्थितांनाही विशेष आकर्षण वाटले. अनेकांनी त्यांच्या लूकचे कौतुक करत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.
Source link
कान्सच्या रेड कार्पेटवर मराठीचा जलवा:प्राजक्ता माळीच्या मोरपिशी नऊवारीसह अशोक-निवेदिता सराफांची शाही एन्ट्री, PHOTOS-VIDEOS