Headlines

डिझेल-पेट्रोल टंचाई विरोधात शेतकरी आक्रमक:क्रांतीकारी शेतकरी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन




डिझेल व पेट्रोलची महागाई तसेच टंचाईच्या निषेधार्थ क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी ता. १९ गोरेगाव चौफुली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. महागाई कमी करून इंधन मुबलक उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हिंगोली जिल्हयात मागील १५ दिवसांपासून डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हयातील ८६ डिझेल पंपासाठी दोन लाख ते अडीच लाख लिटरची आवश्‍यकता असते. सध्या शेती मशागतीची कामे व इतर कामांमुळे डिझेलची मागणी साडेतीन लाख लिटर पर्यंत गेली आहे. मात्र जिल्हयाला वाढीव पुरवठा होत नसल्याने डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात डिझेल पंपावर डिझेल मिळविण्यासाठी रांगा लागत असून तब्बल तीन ते चार तास रांगेत थांबावे लागत आहे. त्यातच इंधनाची दरवाढ करण्यात आली आहे. डिझेल तुटवड्यामुळे शेती मशागतीच्या कामांवर गंभीर परिणाम होत आहे. पेरणीपूर्व मशागत, फवारणी, पाणीपुरवठा यासाठी डिझेल अत्यावश्यक असताना शेतकऱ्यांना पंपावर डिझेल मिळत नसल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे. दरम्यान, केंद्र व राज्य शासनाकडून इंधन उपलब्धतेकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव चौफुली येथे आंदोलन केले. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या नियोजनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शासनाने तातडीने डिझेल उपलब्ध करून द्यावे अन्यथा शासनाच्या विरोधात आणखी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *