![]()
नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी करून त्यांना गुरुवारी रात्री सीबीआयचा साक्षीदार करण्यात आले. याआधी नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएचा (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) पेपर सेटर, लातूरचा प्राध
.
त्याच्या जबाबावरून सीबीआयला असा संशय आला की, डॉ. शिरुरेंनी यांनी आपल्या मुलासाठी पेपर खरेदी केला असावा. प्रा. कुलकर्णीने डॉ. शिरुरेंच्या घरी, हॉस्पिटलमध्ये खास विद्यार्थ्यांसाठी वर्ग घेतले होते. त्यात मोटेगावकरच्या मुलाचाही समावेश होता. डॉ. शिरुरेंच्या मेव्हण्याच्या मुलीने यंदा नीटची परीक्षा दिली. तिच्यासाठीही शिरुरेंनी पेपर खरेदी केल्याचा सीबीआयला संशय होता. त्यांनी पेपर किती रुपयात खरेदी केला, पैसे कसे हस्तांतरित झाले, पेपर कुठे सापडला आणि तो कोणाला वितरित करण्यात आला, हे निश्चित करण्यासाठी सखोल तपास सुरू झाला होता. म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.
सीबीआयने गुरुवारी (२१ मे) सायंकाळी डॉ. शिरूरेंचा बंगला, सिद्धिविनायक रुग्णालयाची पुन्हा झडती घेतली. तेथील कागदपत्रे आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले. शिरुरेंच्या शेजारी राहणारे त्यांचे मेहुणे डॉ. प्रवीण कुलकर्णीच्या मयूरेश्वर अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ४०५ मधील घराची झडती घेतली. बुधवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सीबीआयचे पथक डॉ. शिरूरेंच्या घरात ठाण मांडून होते. त्यानंतर त्यांना नोटीस देवून पुण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले.
अंबाजोगाईची भावंडे मोटेगावकरचे विद्यार्थी : दरम्यान, नीट पेपरफुटीचे धागेदोरे बीड जिल्ह्यात पोहोचल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने अंबाजोगाईतील एका विद्यार्थी भावंडाची आणि त्यांच्या शिक्षिका आईची दोन तास कसून चौकशी केली. दोन्ही भावंडे मोटेगावकर क्लासचे विद्यार्थी आहेत.
प्रा. मांढरे, वाघमारेंच्या मोबाइलमध्ये पेपर खरेदी करणाऱ्यांचे तपशील
दुसरीकडे पेपर फोडणाऱ्या टोळीकडून पेपर खरेदी करणारा नाशिक येथील आरोपी शुभम खैरनारची सीबीआय पुण्यात झाडाझडती घेणार आहे. पुण्यातून काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेली जीवशास्त्र, प्राणीशास्त्राच्या पेपर सेटर प्रा. मनीषा मांढरे आणि तिची साथीदार, ब्युटीशियन मनीषा वाघमारे यांच्या मोबाइलमध्ये पेपर खरेदी करणाऱ्यांचे तपशील सापडले आहेत. त्यांचा शोध सीबीआयने सुरू केला आहे.
प्रा. मांढरे, वाघमारेच्या हस्ताक्षराचे नमुने घेतले
नाशिक येथून अटक केलेल्या शुभम खैरनारला गुरुवारी पुण्यातील सीबीआय कार्यालयात आणून त्याची चौकशी सुरू आहे. प्रा. मनीषा मांढरे, ब्यूटिशियन मनीषा वाघमारे पुण्यातील एकाच सोसायटीत राहतात. त्यांनी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घेतले याचाही तपास सुरू आहे. या दोघींच्या हस्ताक्षराचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. याशिवाय शुभम खैरनार तसेच अहिल्यानगरातील मूळ रहिवासी डॉ. धनंजय लोखंडेशी त्यांचे कनेक्शन शोधले जात आहे.
नीट पेपरफुटीची सर्वात आधी तक्रार देणारे सिकरचे शशिकांत सुथार यांचा ‘दिव्य मराठी’सोबत संवाद
शशिकांत सुथार राजस्थानच्या सिकरचे रहिवासी. १२ वर्षांपासून ते रसायनशास्त्र विषय शिकवतात. गेल्या ३ वर्षांपासून सिकरच्या गुरुकृपा इन्स्टिट्यूटमध्ये ते नीटची तयारी करुन घेतात. पेपर फुटल्याची पहिली तक्रार त्यांनीच केली होती. ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी दिलेली माहिती त्यांच्याच शब्दांत..
३ मे रोजी पेपर झाल्यावर मी प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले. घरी आलो तेव्हा शिक्षक असलेल्या घरमालकांनी मला एक व्हायरल पीडीएफ दाखवली. त्यात रसायनशास्त्राचे १०४ प्रश्न होते. त्याला ‘गेस’ पेपर म्हटले होते. त्यातील रसायनशास्त्राचे ४५ प्रश्न जसेच्या तसे नीटच्या प्रश्नपत्रिकेत उतरले होते. मी १२ वर्षांपासून रसायनशास्त्र शिकवतोय. इतका अचूक अंदाज कुणालाच वर्तवता येत नाही. घोटाळ्याची चाहूल लागल्याने ३ मे नंतर ७ मे पर्यंत मी क्लासला सुटी घेतली . या काळात मी मित्रांसोबत पेपर फुटल्येच पुरावे जमवले. त्यानंतर ७ मे रोजी एनटीए, सीबीआय, शिक्षण मंत्रालयाला मेल पाठवला. सुरुवातीला रसायनशास्त्राचे प्रश्न फुटल्याचा संशय होता. घरमालकाने मला दुसरी पीडीएफ दाखवली ती जीवशास्त्राची होती. त्यात ३०० प्रश्न होते. मी जीवशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षक मित्राला ती पीडीएफ पाठवली. त्यानेही जीवशास्त्राचे बहुतांश प्रश्न जसेच्या तसेच आल्याचे सांगितले. मग मात्र प्रश्नपत्रिका फुटल्याची खात्री झाली. मी, घरमालक व मित्र आम्ही सर्वांनी ३ मे रोजीच रात्री थेट स्थानिक पोलिस ठाणे गाठून याची माहिती दिली. पण, या दोन व्हायरल पीडीएफ शिवाय आमच्याकडे काहीच पुरावे नव्हते. गुन्हा नोंद करायचा तर तसे पुरावे हवेत असे पोलिसांनी सांगितले.आम्ही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या थेट एनटीएकडे तक्रारीसाठीचा सल्ला दिला. तत्काळ प्रतिसाद, यंत्रणा कामाला : या सगळ्यात सकारात्मक गोष्ट ही होती की, आम्ही तक्रार केल्यानंतर आम्हाला तत्काळ प्रतिसाद मिळाला. सीबीआय, राजस्थान एसओजी, एनटीए यांच्याकडून फोन आले. सीबीआयाचे पथक दिल्लीहून लगेच आले. आमच्याशी चर्चा केली. आमचे जबाब नोंदवले. आणि तपास सुरु झाला. हे सगळं करताना भीती वाटली नाही. २२ लाख विद्यार्थी जीव तोडून मेहनत करतात. त्यांच्या स्वप्नांशी खेळण्याचे काम झाले होते. त्या विद्यार्थ्यांची प्रेरणा घेऊनची मी तक्रार केली.
सीबीआयच्या ७ अधिकाऱ्यांचे पथक अंबाजोगाईत पोहोचले विद्यार्थ्यांच्या घरी
गुरुवारी सकाळी १०.३० वाजता सीबीआयचे ७ अधिकाऱ्यांचे पथक दोन वाहनांतून अंबाजोगाईतील गुरुवारपेठ भागातील संबंधित विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचले. यातील बहीण ‘रिपीटर’ तर भाऊ ‘फ्रेशर’आहे. या दोघांना पेपर किंवा त्यातील प्रश्न परीक्षेपूर्वीच मिळाले होते, असा संशय आहे. पथकाने सकाळी ११.३० ते दुपारी दीड वाजेपर्यंत या दोघांची व त्यांच्या शिक्षिका आईची चौकशी केली. पथकाने त्यांच्याकडील काही कागदपत्रे आणि मोबाइल चॅट्सची तपासणी केली. त्यांचे मोबाइल ताब्यात घेतले. २ तासांच्या या चौकशीनंतर पथक दुपारी दीड वाजता लातूरला गेले. सीबीआय पथकाने अंबाजोगाईत गुरुवार पेठ भागात पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. शिक्षिका भाडेतत्त्वावरील घरात राहत असल्याने पथकाने पोस्टमनला सोबत घेऊन शिक्षिकेचा पत्ता शोधला. सूत्रांच्या माहितीनुसार नीट पेपरफुटीच्या लिंक धाराशिव व परभणी जिल्ह्यातही आहेत. तेथील काही विद्यार्थी व पालक चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे.
लातूरला मोटेगावकरच्या ‘प्रीमियम’ बॅचचे ६० टक्के विद्यार्थी एमबीबीएस होत होते
आरसीसी क्लासेसमध्ये जवळपास १५ हजार विद्यार्थी खाजगी शिकवणी घेतात. प्रथम, अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या दोन महिन्यांच्या आत ३६० मार्कच्या ४ परीक्षा घेऊन ६ बॅच बनवल्या जातात. येथे सुरुवातीलाच ५० विद्यार्थ्यांची एक ‘प्रीमियम बॅच’ तयार केली जाते. त्यांच्याकडून तब्बल दुप्पट फी साधारणतः दीड लाख रुपये आकारून त्यांना ‘व्हीआयपी’ सोयीसुविधा दिल्या जातात. इतर बॅचेसच्या तुलनेत या बॅचचा अभ्यासक्रम जलद गतीने पूर्ण केला जातो. गुणांआधारे एम्स (३००+ गुण), अर्जुना एम्स (३००- गुण) आणि २५० पेक्षा कमी गुण असणाऱ्यांसाठी तपस्वी, न्यूक्लिअस, तेजस्वी, सुपर फोटॉन अशा ६ बॅचेस बनवल्या जातात. १२ वीत दुसऱ्या क्लासमधून येणाऱ्यांसाठी ‘प्लॅटिनम’ बॅच असते. या सामान्य बॅचमध्ये २५० ते ३०० मुले असतात.
‘प्रीमियम’ बॅचमधील ६०% मुले एमबीबीएससाठी पात्र :या विशेष सवलतींमुळे प्रीमियम बॅचमधील ६०% मुले एमबीबीएससाठी पात्र ठरतात, तर सुविधांभावी जनरल बॅचमधील केवळ १५% मुलेच उत्तीर्ण होतात. निकालांनंतर क्लासेस ज्या जाहिराती करतात, त्यात प्रामुख्याने याच प्रीमियम बॅचच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा भरणा असतो. हे व्यावसायिक गणित न समजल्यामुळे सर्वसामान्य पालक आपल्या मुलांवर रोष व्यक्त करतात.
1. पेपरसेटर कुलकर्णीशी संशयास्पद कॉलिंग सीबीआयच्या अटकेतील प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि डॉ. शिरूरेंचे एप्रिलमध्ये संशयास्पद कॉलिंग झाली. शिरुरेंच्या सिद्धिविनायक रुग्णालयातही डॉ. कुलकर्णीची ये-जा वाढल्याचे सीसीटीव्ही फुटेज सीबीआयच्या हाती लागले होते. 2. घर, रुग्णालय दिले खास क्लाससाठी नीटचे प्रश्न विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रा. कुलकर्णीने डॉ. शिरुरेंच्या घर, रुग्णालयात खास विद्यार्थ्यांचे क्लास घेतले. या क्लासमध्ये शहरातील निवडक मुलांचा तसेच प्रा. मोटेगावकरचा मुलगाही सहभागी झाला होता, अशी माहिती समोर आली होती. 3. मेहुण्याच्या घरातील एक परीक्षार्थी होता शिरुरेंचे मेहुणे डॉ. प्रवीण कुलकर्णी त्यांच्या शेजारी राहतात. डॉ. कुलकर्णीच्या घरातील एकाने परीक्षा दिली होती. त्याच्यासाठी डॉ. शिरुरे यांनी पेपर विकत घेतल्याचा संशय सीबीआयला होता. म्हणून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. कुणीही पुढे न आल्याने स्वत: तक्रार केली ३ मे रोजी आमच्याकडे पुरेसे पुरावे नव्हते म्हणून आम्ही तक्रार नोंदवली नाही.
कुणीही पुढे न आल्याने स्वत: तक्रार केली
३ मे रोजी आमच्याकडे पुरेसे पुरावे नव्हते म्हणून आम्ही तक्रार नोंदवली नव्हती, पण जनआंदोलन उभे रहावे यासाठी आम्ही एका स्थानिक मित्राच्या चॅनलच्या मदतीने प्रश्न मांडून तो समोर आणला. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. कुणीच पुढे येत नसल्याचे पाहून मी पुढाकार घेत तक्रार दाखल केली.