![]()
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत मोठी मागणी केली आहे. राज्यात शेतकरी, शेतमजूर आणि अल्पभूधारक आर्थिक अडचणीत असताना सरकारने प्राधान्यक्रम बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. पैशांची कमतरता असेल तर लाडकी बहीण योजना बंद करा, पण शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्या, अशी थेट मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. सरकारने मतांसाठी योजना राबवण्यापेक्षा कष्टकरी वर्गाला मदत करावी, असा टोला देखील त्यांनी लगावला. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, मराठा समाजाच्या महामंडळासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मात्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागास घटकांच्या महामंडळांना केवळ शेकडो कोटी नव्हे तर किमान 15 हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची आवश्यकता आहे. महात्मा फुले महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ तसेच इतर समाजांच्या महामंडळांना मोठा निधी मिळायला हवा. समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक बळ दिल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना सदावर्ते यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. गेल्या 4 वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींचे पैसे रखडले आहेत. कांद्याला किमान 2 हजार रुपये भाव मिळायला हवा. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक एकरमागे 10 हजार रुपये आगाऊ मदत सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना थेट मदत मिळाली पाहिजे. सरकारकडे निधी कमी असेल तर राजकीय हेतूने सुरू असलेल्या योजनांवर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करावी, असे ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेवर टीका करताना सदावर्ते यांनी महिलांच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले. महिलांना शिष्यवृत्ती, शिक्षण आणि रोजगारासाठी मदत द्यावी. महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीत वाढ व्हायला हवी. ग्रामीण भागातील महिलांना मिळणाऱ्या रोजंदारीचे दर वाढवले पाहिजेत. स्वतःच्या शेतात काम करणाऱ्या अल्पभूधारक महिलांनाही मनरेगा सारख्या योजनांचा लाभ मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करायचे असेल तर त्यांना रोजगार आणि शिक्षणात बळ द्या, केवळ योजनांमधून पैसे वाटून राजकारण करू नका, असेही त्यांनी म्हटले. लाड यांनी जरांगेंचा लाड केला दरम्यान, मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्या भेटीवरही सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली. प्रसाद लाड यांनी जरांगेंचा लाड केला, पण जरांगेंचा विचार मात्र विळ्यासारखा वाकडाच राहिला, अशी टीका त्यांनी केली. मनोज जरांगेंच्या मागण्या संविधानाशी संबंधित नसल्याचा दावा करत त्यांनी आंदोलनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुप्रीम कोर्टानेही अशा योजनांबाबत टिप्पणी केली असल्याचे सांगत, सरकारने लोकांना सक्षम करण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखावे, अशी भूमिका गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली.
Source link