![]()
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीचे राजकारण आता चांगलेच तापत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या प्रकरणी कोकणातील रायगड – रत्नागिरी व सिंधुदुर्ग मतदारसंघातून राजन साळवी यांना उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. स्वतः राजन साळवी यांनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी नाशिक येथून सोनिया होळकर यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. सोनिया ह्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नात आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यात भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 12, तर शिवसेना 3 व राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. यातील काही जागांवर या पक्षांकडून अदलाबदली केली जाण्याचीही शक्यता आहे. या प्रकरणी या तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये या जागांवर आपली वर्णी लागावी यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते राजन साळवी यांनी आपण कोकणातील रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग जागेवर दावा केला आहे. पक्षाने संधी दिली तर मला निवडणूक लढवायला आवडेल. मी या प्रकरणी माझी इच्छा पक्षाकडे व्यक्त केली आहे. या प्रकरणी पक्ष देईल तो आदेश मान्य असेल. महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतली. काही जागा अदलाबदलीही होऊ शकतात, असे राजन साळवी यांनी म्हटले आहे. रायगडमध्ये शिवसेना – राष्ट्रवादीत चुरस रायगडच्या जागेवरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस आहे. मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या मुलासाठी या जागेवर दावा केला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जागेवर आपला दावा सांगितला आहे. त्यातच राजन साळवी यांनी स्वतः ही जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे या प्रकरणी मोठा राजकीय तिढा होण्याची शक्यता आहे. युती झाली तर काही जागांमध्ये आदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीचा वसंतदादा पाटलांच्या नातीवर डाव दुसरीकडे, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातून सोनिया होळकर यांच्या नावावर विचार सुरू केला आहे. सोनिया होळकर या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नात आहेत. त्यांच्या मातोश्री सध्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे सोनिया महाविकास आघाडीकडून लढणार की भाजपकडून याविषयी सस्पेन्स आहे. पण सोनिया यांचा नाशिकच्या शहरी व ग्रामीण भागात चांगला प्रभाव आहे. त्यामुळे त्यांचा मविआला मोठा फायदा होऊ शकतो.
Source link
विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे तापले:शिवसेनेकडून राजन साळवी, तर महाविकास आघाडीकडून सोनिया होळकरांचे नाव चर्चेत